चाफे महाविद्यालयात मिशन रायझिंग फ्लॉवर्स अंतर्गत विद्यार्थी सुरक्षिततेविषयी जनजागृती

तरवळ दि. २८ जुलै (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड संचलित मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ व ‘महिला विकास कक्ष’ या विभागातील विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे विद्यार्थी मिशन रायझिंग फ्लॉवर्स अंतर्गत सुरक्षिततेबाबत जनजागृती पर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २४ जुलै रोजी करण्यात आले होते.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने जिल्हाभर मिशन रायझिंग फ्लॉवर्स हे अभियान राबविण्यात येत आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षितते संदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बागाटे व रत्नागिरी जिल्हा पोलिस अप्पर अधिक्षक श्री महामुनी यांच्या माध्यमातून हे अभियान सुरू करण्यात आले असून , रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुरक्षितता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, महिलांची सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, वाहतूक नियमांचे पालन तसेच आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची काळजी तसेच अंमली पदार्थांच्या सेवनापासून विद्यार्थ्यांना दूर कसे ठेवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्व संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
जयगड सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय पाटील यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे, संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेणे आणि कोणत्याही प्रकारचा छळ फसवणूक किंवा गुन्ह्यांची त्वरित पोलिसांकडे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि जनजागृतीचा संदेश दिला.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये, जयगड पोलिस शिवम आंबुलकर ,चाफे गावचे पोलिस पाटील श्री. तांबे, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाल ओपे॑. यांनी केले तसेच आभार प्रा. सुयोग मोहिरे यांनी मानले.



