अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा. हनुमंत कदम यांची निवड

तरवळ दि. २८ जुलै (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील व मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज येथील अर्थशास्त्र व समाजशास्त्र विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक हनुमंत नारसिंह कदम यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.
प्रा. हनुमंत नारसिंह कदम हे गेली अनेक वर्षे मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचे अध्यापन करीत होते. तसेच मराठी भाषेवर सुद्धा त्यांचे खूप प्रभुत्व होत. सामाजिक व साहित्य क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद मोरे तसेच उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांनी २०२८ पर्यंत केली आहे.
हनुमंत नारसिंह कदम हे माढा तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल वाडी येथील आहेत. गेली अनेक वर्षे ते रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. गेली अनेक वर्षे ते शिक्षण क्षेत्रात काम करीत आहेत. संत साहित्याचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. तसेच निवेदन करण्यात देखील त्यांनी नावलौकिक मिळविलेला आहे. त्यांनी केलेल्या या साहित्यातील भरीव कामगिरी बद्दल त्यांची रत्नागिरी जिल्हा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे, जेणे करून रत्नागिरी जिल्ह्यात मराठी साहित्याच्या प्रसार आणि प्रचार ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते तालुक्यातील कवी केशवसुत स्मारक समितीचे सदस्य देखील आहेत.
प्रा. हनुमंत नारसिंह कदम यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे साहित्य क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या हातून साहित्याचे उत्तम काम होवो या साठी त्यांना शुभेच्छा सुद्धा देण्यात येत आहेत.



