रत्नागिरी

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातर्फे जागतिक कांदळवन संवर्धन दिन

क्षेत्रभेटीमुळे पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांना जाणवली

रत्नागिरी दि. २८ जुलै : जागतिक कांदळवन संवर्धन दिनानिमित्त गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) वनस्पतीशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व चिंचखरी येथील कांदळवन क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्थेचे वैज्ञानिक महत्त्व, जैवविविधता संवर्धनातील भूमिका, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांची आवश्यकता आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष अनुभवातून समजली.

वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. शरद आपटे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कांदळवनांची विविधता आणि त्यांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी रत्नागिरी किनारपट्टीवरील कांदळवनांची समृद्ध जैवविविधता, किनारी परिसंस्थेतील त्यांची भूमिका, कार्बन संचयन, किनारपट्टीचे धूपापासून संरक्षण, मत्स्यसंपदेचे संवर्धन हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कांदळवनांचे संवर्धन का आवश्यक आहे याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या वेळी उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी प्रमुख उपस्थित होत्या.

चिंचखरी येथील कांदळवन क्षेत्रभेटीत प्रा. शरद आपटे यांनी मार्गदर्शन केले. या क्षेत्रभेटीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष वनस्पतीशास्त्र विभागातील ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या क्षेत्रभेटीदरम्यान डॉ. विराज चाबके व प्रा. प्रियांका शिंदे-अवरे उपस्थित होते.

क्षेत्रभेटीत समजले कांदळवन प्रजातींचे महत्त्व

विद्यार्थ्यांनी विविध कांदळवन वनस्पतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांची वैशिष्ट्ये, पर्यावरणीय महत्त्व आणि संवर्धनाची गरज जाणून घेतली. यामध्ये काळा कांदळ, पांढरा कांदळ, लाल कांदळ, चिपी, गेवा, करंजी तसेच खारकाटेरी या प्रमुख कांदळवन प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांना या वनस्पतींमधील क्षार सहन करण्याची क्षमता, श्वसनमुळे, आधारमुळे, बियांचे झाडावरच अंकुरण, भरती-ओहोटीशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच किनारी परिसंस्थेच्या संरक्षणातील त्यांचे महत्त्व प्रत्यक्ष दाखवून सांगण्यात आले. कांदळवन परिसरातील इतर जीवसृष्टीचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्थेतील परस्परसंबंध समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम डॉ. विराज चाबके व प्रा. परेश गुरव आदींनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button