पासधारक विद्यार्थिनींना बसमधून खाली उतरवल्याप्रकरणी एसटी चालक-वाहकावर कारवाई
ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत ह्यांच्या तक्रारीची दखल

रत्नागिरी दि. २८ जुलै : पालि-घाटीवळे बसच्या चालक-वाहकाने पासधारक विद्यार्थिनींना दमदाटी करून खाली उतरविल्याचा प्रकार नाणीज बसस्टॉपवर घडला होता. या निंदनीय प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या तक्रारीनंतर रत्नागिरी विभाग नियंत्रक यांनी तात्काळ कारवाई केली आहे.
रत्नागिरी विभाग नियंत्रक यांनी याबाबतचे पत्र पाठवून प्रसाद सावंत यांना याबाबतची माहिती दिली आहे. दिनांक 11 जुलै रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, रत्नागिरी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची दखल घेत विभाग नियंत्रकांनी पत्राद्वारे कळवले की, सदर जबाबदार चालक-वाहकावर रा.प.महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार खातेअंतर्गत प्रमादिय कार्यवाही करण्यात आली आहे.
याशिवाय रा.प.लांजा आगारातील सर्व चालक-वाहकांना प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागण्याबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जनतेच्या तक्रारीला प्रतिसाद देतानाच महामंडळाने तक्रारदार प्रसाद सावंत यांच्या दक्षतेबद्दल आभार मानले असून प्रवासी हितासाठी त्वरित पावले उचलली आहेत.



