काजूर्ली येथील कै. डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

तरवळ दि. २७ जुलै (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी, मालगुंड संचलित कै.डॉ. दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय, काजुर्ली तालुका गुहागर येथे सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी पालक सभा व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक आशिष घाग यांनी केले, तसेच शाळेच्या वर्षभरातील शैक्षणिक नियोजन,परीक्षा, शिष्यवृत्ती,विविध स्पर्धा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना व उपस्थित सर्व मान्यवरांना आपल्या प्रास्ताविकातून करून दिली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ.आर.जी. कुलकर्णी यांनी शाळेच्या डिजिटल शिक्षणाला चालना मिळावी या उद्देशाने एक संगणक संच भेट दिला. तसेच कोल्हापूर येथील डॉ नानासाहेब मयेकर मित्रमंडळाच्या वतीने मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे सल्लागार उमेश अपराध ,डॉ.रवींद्र पोर्लेकर, डॉ.उज्वल मुजुमदार, संजय कदम, अभिनंदन पोकळे, नचिकेत भद्रे व श्री.कदम या सर्व मंडळींनी प्रतिवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. सर्व देणगीदारांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागातून सातवा क्रमांक, भातगाव केंद्रातून व आबलोली बीटातून प्रथम क्रमांक मिळविणारी कु. तनया प्रवीण मोहिते हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन इयत्ता आठवीत प्रवेश घेतलेल्या सानवी राणे, प्रीती रेवाळे, सेजल गोणबरे, ऋषिकेश तावडे व संभव गोणबरे या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शैक्षणिक साहित्य वितरणानंतर कु.तनया मोहिते,कु.पायल साळवी, कु.सानवी राणे,कु.सेजल गोणबरे,कु.काजल गावडे, कु.विघ्नेश साळवी व कु. तेजस देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करून देणगीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेले सहकार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत शिस्त, संस्कार, वाचनाची आवड आणि स्पर्धात्मक वृत्ती जोपासावी, असे मार्गदर्शन केले. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थेच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत असून अशा उपक्रमांमुळे शिक्षणाला नवी दिशा मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर हे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक परकर, खजिनदार ,संदीप कदम, सेक्रेटरी विनायक राऊत सहसेक्रेटरी श्री.मेहंदळे तसेच संचालक किशोर पाटील, रोहित मयेकर व परेश हळदणकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे व देणगीदार म्हणून प्राचार्य डॉ.आर.जी. कुलकर्णी,मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार उमेश अपराध ,डॉ.रवींद्र पोर्लेकर, डॉ.उज्वल मुजुमदार, संजय कदम, अभिनंदन पोकळे, तसेच श्री.कदम नचिकेत भद्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत, काजुर्लीच्या सरपंच सौ. मेघना मोहिते, उपसरपंच सुधाकर गोणबरे, ग्रामसेवक अनुज राऊळ, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माजी सरपंच अनंत मोहिते, पोलीस पाटील सौ. सीमा लिंगायत, केंद्रप्रमुख श्री.खर्डे ,काजुर्ली शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक श्री.काकडे यांच्यासह पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका पल्लवी महाडिक यांनी केले.



