रत्नागिरी

युनायटेड गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी घेतला वारीचा अनुभव

संगमेश्वर दि. २७ जुलै ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेची समृद्धता दाखवणारा वर्षानुवर्ष चालू असलेल्या शिस्तबद्ध श्रद्धापूर्वक भक्तीचा अखंडित नेम म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. या वारीचा संक्षिप्त स्वरूपात का होईना पण अनुभव घेऊन या अनुभवाने समृद्ध झाले पाहिजे या उद्देशाने युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुलात देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने गुरुकुल विभाग ते चिपळूण खेंड येथील पंचमाडकर विठ्ठल मंदिर इथपर्यंत पायी दिंडी आणि मंदिरात भजन सेवेच आयोजन करण्यात आले होते. समाजातली श्रद्धा,सेवाभाव,दातृत्व असे सामाजिक भाव समजून घेण्याच्या उद्देशाने मनोमयकोशाशी जोडलेला हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांमधलं श्रद्धा आणि सेवाभावाचे जागरण!

गुरुकुलाच्या आषाढ वारीची सुरुवात शाळेच्या आवारातील परशुरामाला नमस्कार करून झाली. गुरुकुलचे विद्यार्थी, अध्यापक अध्यापिका,शिक्षण प्रेमी मुखाने नाम घोष करत युनायटेड प्रशाले मधून निघून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र – चिंचनाका – चिपळूण नगरपरिषद – खेंड गणपती मंदिर- खेंड मारुती मंदिर अशा मार्गाने पारंपारिक वेशभूषा,हातात झेंडे, गळ्यात टाळ आणि मुखाने ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय राम कृष्ण हरी असा नाम घोष करत विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचले मंदिरात चालू असणाऱ्या पूजा आणि आरती मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक भजन सेवा सादर केली.

श्लोक, नमन, गजर, रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग, प्रसिद्ध प्रचलित भक्ती गीते इत्यादीचे दर्जेदार,सुरेल आणि शिस्तबद्ध सादरीकरण गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी केले. त्याचबरोबर ‘ पायी घुंगुर हाती घ्या वीणा मुखाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया ‘ अशा गजरात समूह नृत्य ही सादर केले. काही विद्यार्थ्यांनी पांडुरंगाचे चित्र रेखाटून आपली सेवा पांडुरंगा चरणी रुजू केली.

संगीत भजन सेवेसाठीच्या पूर्वतयारी दरम्यान गुरुकुल विभागाच्या आप्पासाहेब दांडेकर संगीत विभागा मार्फत चालू असलेल्या संगीत प्रशिक्षण माध्यमातून संगीत प्रशिक्षक श्री. प्रथमेश देवधर आणि वरद केळकर आणि समूह नृत्यासाठी कथक मार्गदर्शिका सौ.मृण्मयी भोळे यांनी मुलांची विशेष तयारी करून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button