भारत शिक्षण मंडळ, स्मार्ट ग्रोथ यांच्यात सामंजस्य करार

रत्नागिरी दि. २६ जुलै : भारत शिक्षण मंडळ आणि अधिकृत टॅली प्रशिक्षण व मूल्यांकन केंद्र स्मार्ट ग्रोथ यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास व रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराअंतर्गत भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी टॅली इसेन्शियल लेव्हल १ ते ४ व टॅली कॉम्प्रीहेन्सीव्ह हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना टॅली, जीएसटी, लेखांकन, वित्त, बँकिंग व ऑडिटिंग विषयांचे उद्योगाभिमुख प्रशिक्षण, ऑनलाइन परीक्षा, डिजिटल व पडताळणीयोग्य प्रमाणपत्र, जॉब पोर्टल सुविधा आणि मॉक टेस्टचा लाभ मिळणार आहे.
स्मार्ट ग्रोथतर्फे प्रशिक्षित अध्यापक, डिजिटल अध्ययन साहित्य, ऑनलाइन मूल्यांकन तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, करारानुसार प्रत्येक बॅचसाठी किमान ३० विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक आहे. सामंजस्य करारावर भारत शिक्षण मंडळाचे सचिव धनेश रायकर तसेच स्मार्ट ग्रोथचे हेड ऑफ सेल्स अँड ऑपरेशन्स नारायण बांदिवडेकर, प्राचार्य सौ. मधुरा पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व तिन्ही शाखाचे प्रमुख तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विनय बावदाने उपस्थित होते.



