रत्नागिरी

अत्यंत खडतर ७२ किमीची खार्दुंगला चॅलेंज; प्रसाद देवस्थळी यांनी यशस्वीपणे केली पूर्ण

रत्नागिरी दि. १२ सप्टेंबर : कोकणच्या शिमगोत्सवाच्या काळात, विशेषतः धामापूर गावात आई नवसरी देवी तसेच वाघजाई देवीच्या पालख्या वाडी-वाडीत आणि घराघरांत नेल्या जातात. मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ या पालख्या खांद्यावर घेऊन अनेक दिवस चालत आपल्या प्रथा-परंपरा जपत असतात. याच परंपरेतून मिळालेली प्रेरणा प्रसाद देवस्थळी यांच्या ७२ किलोमीटरच्या खार्दुंगला चॅलेंजदरम्यान त्यांच्या सोबत होती.

“या संपूर्ण रनदरम्यान प्रत्येक किलोमीटरला आपल्या धामापूर गावातील आई नवसरी देवी आणि वाघजाई देवीच्या पालख्या एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जात आहेत, त्या पालख्यांबरोबर आपले मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ चालत आहेत, हे सतत डोळ्यासमोर येत होते. त्यांच्या जिद्दीचा आणि परंपरेप्रती असलेल्या निष्ठेचा विचार मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होता,” असे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.

याच प्रेरणेच्या बळावर कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी अत्यंत खडतर अशी 72 किलोमीटरची खार्दुंगला चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण केली. ही कामगिरी करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले धावपटू म्हणून त्यांचा गौरव होत आहे. ही संपूर्ण धाव आणि मिळवलेले मेडल कोकणच्या शिमगोत्सवाच्या पारंपरिक पद्धती जपणाऱ्या सर्व मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थांना समर्पित असल्याचे देवस्थळी यांनी सांगितले.

अत्यंत प्रतिकूल हवामान, शून्याच्या आसपासचे तापमान, तब्बल 32.5 किलोमीटरचा खडतर चढ आणि त्यानंतरचे आव्हानात्मक डोंगराळ रस्ते अशा परिस्थितीवर मात करत त्यांनी ही कामगिरी केली.

खार्दुंग गावातून लेहपर्यंतचे 72 किलोमीटरचे अंतर 14 तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. साधारण उणे 1 अंश सेल्सिअस तापमानात या आव्हानाची सुरुवात झाली. खार्दुंगला टॉपच्या दिशेने जाणारा सुरुवातीचा तब्बल 32.5 किलोमीटरचा चढ हा स्पर्धेतील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक होता. खार्दुंगला टॉपपर्यंत पोहोचेपर्यंत तापमान शून्याच्या आसपास होते.

विविध कठीण निकषांद्वारे पात्र ठरलेल्या सुमारे 325 धावपटूंनी या आव्हानात सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण परिस्थितीमुळे सहभागींपैकी अनेकांना हे आव्हान पूर्ण करता आले नाही. पहिल्या 32 ते 32.5 किलोमीटरच्या चढावर बहुतांश धावपटूंना धावण्याऐवजी चालतच पुढे जावे लागले.

“या रनमध्ये शारीरिक क्षमतेपेक्षा इच्छाशक्ती, जिद्द, काटकपणा आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा होती. प्रत्येक पावलावर मन सांगत होतं की आता थांबावं, सोडून द्यावं; पण पुढचं पाऊल टाकत राहणं हाच एकमेव पर्याय होता. इथे येऊन रन करायची असेल तर केवळ प्रॅक्टिस पुरेशी नाही. उंचीशी आणि वातावरणाशी एकरूप होण्यासाठी acclimatisation आणि शेवटपर्यंत give up न करण्याची मानसिकता अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.

खार्दुंगला टॉपनंतर बदलते हवामान, तापमानातील चढ-उतार आणि तुलनेने खडतर रस्ते यामुळे पुढील प्रवासही आव्हानात्मक होता. या संपूर्ण अनुभवातून धावपटूंच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेता आल्याचे देवस्थळी यांनी सांगितले.

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी लडाखमध्ये

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनच्या प्रसार-प्रचारासाठी संपूर्ण टीमसोबत प्रसाद देवस्थळी 28 ऑगस्ट रोजी लेह येथे पोहोचले होते. त्याआधी सूरत, बडोदा, गांधीनगर, इंदूर, जयपूर, आग्रा, गाझियाबाद आदी रत्नागिरीशी रेल्वेने जोडलेल्या शहरांमध्ये कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा प्रचार करण्यात आला.

लडाखमध्ये खार्दुंगला चॅलेंजचे आयोजक पद्मश्री चेवांग मोटुप गोबा यांच्याशीही कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या टीमने संवाद साधला. त्यांना रत्नागिरीमध्ये होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसाठी आमंत्रित करण्यात आले. “कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनविषयी मी खूप ऐकून आहे,” असे श्री मोटूप यांनी आवर्जून सांगितल्याचे देवस्थळी यांनी नमूद केले.

“केवळ स्पर्धांचे आयोजन न करता स्वतःही अशा कठीण स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे धावपटूंना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे प्रत्यक्ष अनुभवता येते. त्यातून भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धांचे आयोजन करता येते,” असे देवस्थळी म्हणाले.

या यशामध्ये मार्गदर्शन करणारे कोच दादा सत्रे यांचे देवस्थळी यांनी विशेष आभार मानले. तसेच संपूर्ण कुटुंबीय, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन फॅमिली आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब फॅमिली यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“संपूर्ण कोकणवासीयांच्या शुभेच्छा, कुटुंबीयांचे प्रेम आणि KCM व RCC परिवाराचा पाठिंबा माझ्यासोबत होता. त्यामुळे ही केवळ माझी कामगिरी नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि प्रत्येक पावलावर शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाची ही कामगिरी आहे,” अशी भावना प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केली.

शेवटी या कामगिरीविषयी बोलताना देवस्थळी म्हणाले, “शिमगोत्सवाच्या काळात आपल्या प्रथा-परंपरा जपण्यासाठी मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ दहा-दहा, बारा-बारा दिवस पालखी घेऊन चालत राहतात. आपल्या धामापूर गावातील आई नवसरी देवी आणि वाघजाई देवीच्या पालख्या वाडी-वाडीतून फिरत असतात. त्या पालख्यांबरोबर चालणारे आपले मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यासमोर होते. त्यांच्या जिद्दीचा विचार करत 72 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे ही संपूर्ण धाव आणि हे मेडल कोकणच्या शिमगोत्सवाच्या पारंपरिक पद्धती जपणाऱ्या सर्व मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थांना मनापासून समर्पित आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button