कृषीरत्नागिरी

वणौशी येथे दापोली कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ‘अझोला उत्पादन’ प्रात्यक्षिक संपन्न

वणौशी दि. १२ सप्टेंबर (सागर गोवळे) : – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित कृषी महाविद्यालय दापोली यांच्या ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी स्नेही’ गटातर्फे वणौशी येथे अझोला उत्पादनाचे यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. पशुखाद्यावरील वाढता खर्च कमी करून शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चात पौष्टिक आणि पूरक पशुखाद्य उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्थानिक शेतकरी श्री. नयन गामरे यांच्या शेतावर हे प्रात्यक्षिक पार पडले.

अझोला खड्ड्याची उभारणी व प्रत्यक्ष कृती

प्रात्यक्षिकादरम्यान ६ फूट लांब, ४ फूट रुंद आणि १ फूट खोल आकाराचा खड्डा तयार करण्यात आला. पाणी गळती रोखण्यासाठी ताडपत्री अंथरून तिच्या कडा मातीने बंद करण्यात आल्या. खड्ड्यात ७ ते ८ इंच स्वच्छ पाणी भरून त्यात ३ किलो शेण, बारीक मातीचा थर आणि ३० ग्रॅम एसएसपी (SSP) चे मिश्रण टाळण्यात आले. मिश्रण स्थिर झाल्यानंतर त्यात निरोगी ‘अझोला कल्चर’ सोडण्यात आले. अझोला कल्चर सोडल्यानंतर १५ दिवसांत ते वापरासाठी तयार होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देखभाल व वापराबाबत मार्गदर्शन

अझोलाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य पाणीपातळी, अर्धसावली, स्वच्छता आणि नियमित पोषणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना पटवून दिले.

पहिल्या काढणीनंतर २०–३० टक्के पाणी बदलावे.

३–४ काढण्यांनंतर खड्ड्यातील संपूर्ण पाणी बदलणे आवश्यक आहे.

काढलेला अझोला स्वच्छ पाण्याने धुऊनच गायी, म्हशी व वासरांना पूरक खाद्य म्हणून द्यावा.

अझोलामध्ये प्रथिने, खनिजे व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असून त्याचा वापर जैवखत किंवा हिरवळीचे खत म्हणूनही करता येतो.

विद्यार्थ्यांचे योगदान आणि मार्गदर्शन

या प्रात्यक्षिकासाठी समृद्धी जाधव, निलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे आणि आकांक्षा गाडगे या कृषीकन्यांनी विशेष परिश्रम घेतले.

हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेष तज्ज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या उपक्रमामुळे वणौशीतील शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाची सोपी, कमी खर्चाची व शाश्वत पद्धत प्रत्यक्ष शिकायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button