महामार्गावरील मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर; युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

रत्नागिरी दि. २१ जुलै :- रत्नागिरी तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
यावेळी प्रसाद सावंत यांच्या बरोबर तालुकाप्रमुख मयूरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, संदेश नारगुडे, किरण तोडणकर, सचिन सावंतदेसाई, प्रशांत रायंगणकर, सुफियान जयगडकर, नंदकुमार कदम, सायली पवार, मिताली पवार, गंधाली मयेकर, सेजल बोराटे आदी उपस्थित होते.
दि. 21/07/2026 रोजी दिलेल्या निवेदनात श्री. सावंत यांनी म्हटले आहे की, रस्त्यावर मोकाट सुटलेल्या गायी, म्हशी यांच्यामुळे नागरिकांच्या जीवितास आणि वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. ही समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे.
युवासेनेच्या मागण्या:
1. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लेखी सूचना देण्यात यावी की नागरिकांनी गुरे महामार्गावर मोकाट सोडू नयेत.
2. गुरांसाठी सुरक्षित गोठा/बंदिस्त जागा उपलब्ध करून द्यावी.
3. मोकाट गुरे आढळल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई करावी.
या संबधीत योग्य ती कार्यवाही केली जाईल आणि याबाबत ग्रामसेवकांना पत्र पाठवून तशा सक्त सूचना दिल्या जातील असे आश्वासन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आपणास दिल्याचे प्रसाद सावंत यांनी सांगितले.



