रत्नागिरी

स्वरूपानंद पतसंस्थेच्या ‘ठेववृद्धी मासा’त ३४ कोटी १९ लाखांची भर

२,२२५ खात्यांत नव्याने ठेवी; २६९ नवीन ठेवीदार संस्थेशी जोडले; ५०० कोटींच्या ठेवींच्या दिशेने दमदार वाटचाल

रत्नागिरी दि. २१ :- ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्तीच्या बळावर कार्यरत असलेल्या स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ‘ठेववृद्धी मासा’ला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० जून ते २० जुलै या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संस्थेच्या विविध ठेव योजनांमध्ये तब्बल ३४ कोटी १९ लाख रुपयांच्या नव्या ठेवी जमा झाल्या. या कालावधीत २,२२५ खात्यांमध्ये नव्याने ठेवी जमा झाल्या, तर २६९ नवीन ठेवीदार संस्थेशी जोडले गेले.

ठेववृद्धी मासाच्या प्रारंभी संस्थेच्या एकूण ठेवी ४१४ कोटी रुपये होत्या. अवघ्या एका महिन्यात त्यामध्ये लक्षणीय वाढ होऊन २० जुलै अखेर संस्थेच्या ठेवी ४४६ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. संस्थेच्या सर्व १७ शाखांमध्ये ठेववृद्धी मासाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला सातत्याने मिळणारा उत्तम प्रतिसाद आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास यामुळे स्वरूपानंद पतसंस्था आता ५०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या महत्त्वपूर्ण टप्प्याकडे दमदार वाटचाल करत आहे.

संस्थेची विश्वासार्ह प्रतिमा, आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवस्थापन आणि उत्तम ग्राहक सेवा यामुळे ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस दृढ होत आहे. संस्थेची आर्थिक स्थितीही भक्कम असून ९९.७८ टक्के वसुली, शून्य टक्के एनपीए, २७ टक्के CRAR, २०० कोटी रुपयांची बँक गुंतवणूक आणि ३०७ कोटी रुपयांचे कर्जवाटप अशी उल्लेखनीय आर्थिक स्थिती संस्थेने कायम राखली आहे. या भक्कम आर्थिक पायावर आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेची प्रगती सातत्याने सुरू आहे.

ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले, “ठेववृद्धी मासाला मिळालेला प्रतिसाद हा स्वरूपानंद पतसंस्थेवरील सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या दृढ विश्वासाच्या नात्याची पावती आहे. संस्थेची आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि उत्तम ग्राहक सेवा यामुळे हा विश्वास सातत्याने वृद्धिंगत होत आहे. ठेवीदारांच्या विश्वासाचे जतन करणे आणि त्यांना सुरक्षित, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण सेवा देणे हीच संस्थेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ग्राहकांच्या या विश्वासाच्या बळावर स्वरूपानंद पतसंस्था ५०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या दिशेने वाटचाल करत असून, भविष्यातही संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला असाच उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.

दरवर्षी २० जून ते २० जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणारा ‘ठेववृद्धी मास’ हा स्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आणि ग्राहकांशी असलेल्या विश्वासाच्या नात्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. यंदाच्या ठेववृद्धी मासातील उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्थेच्या आगामी वाटचालीला निश्चितच नवी ऊर्जा मिळाली असून, ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठण्याच्या दिशेने संस्थेची वाटचाल अधिक वेगाने सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button