रत्नागिरी

नाणीजक्षेत्री गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ती आणि श्रद्धेचा महासागर

लाखो भाविकांच्या उपस्थितीत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे शुभाशीर्वाद

नाणीज, दि. २९ जुलै : श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आज भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाचा अभूतपूर्व संगम अनुभवायला मिळाला. मुसळधार पावसाची पर्वा न करता महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड आदी राज्यांतून लाखो भाविक नाणीजधाम येथे दाखल झाले. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सान्निध्यात पार पडलेल्या गुरुपूजन सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

पहाटेपासूनच सुंदरगड परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी साडेआठ वाजता कार्यक्रम सुरू होणार असला तरी अनेक भाविक पहाटेपासूनच पूजेचे साहित्य आणि जगद्गुरूंची प्रतिमा घेऊन आपल्या जागी विराजमान झाले होते.

सोहळ्यापूर्वी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरासह विविध देवतांचे दर्शन घेतले. संतपीठावर आगमन होताच सुवासिनींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. जयघोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वाद दिले. त्यानंतर वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपूजन विधीला प्रारंभ झाला.

संतपीठावरून सांगितल्या जाणाऱ्या मंत्रोच्चारांनुसार लाखो भाविकांनी एकाच वेळी गुरुपूजन केले. हळद-कुंकू, पुष्पार्पण, निरांजन, घंटानाद आणि औक्षण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हा सामूहिक पूजाविधी सुरू होता. सुंदरगड परिसरात सर्वत्र भाविकांचीच उपस्थिती दिसून येत होती.

या प्रसंगी सौ. सुप्रियाताई, सौ. ओमेश्वरीताई, देवयोगी यांच्यासह जगद्गुरूंचा परिवार उपस्थित होता. पूजनानंतर जगद्गुरूंनी उपस्थितांना शुभाशीर्वाद देताना, “आजची गुरुपौर्णिमा ही सर्वांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान व कल्याण लाभो,” असा आशीर्वाद दिला.

काल प्रारंभ झालेल्या सप्त चिरंजीव महामृत्युंजय यागाची सांगता आज दुपारी झाली. संपूर्ण यागाचे पौरोहित्य वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी यांनी केले. त्यानंतर चरणदर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला. गुरुदर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

संतपीठ, मुख्य मंदिरे आणि संपूर्ण सुंदरगड परिसर विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. संतशिरोमणी गजानन महाराज, प्रभू श्रीराम, वरदविनायक तसेच अन्य मंदिरांमध्ये दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी होती.

डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महाप्रसादाचा लाभही हजारो भाविकांनी घेतला. पिण्याच्या पाण्यासह सर्व सुविधा सुयोग्यरीत्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

लाखोंची उपस्थिती असूनही संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन, मार्गदर्शन आणि सेवा कार्य प्रभावीपणे सांभाळले. त्यामुळे कुठेही गोंधळ किंवा गैरसोय झाली नाही.

राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यातून आलेल्या भाविकांमुळे नाणीज परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र रुंद झालेल्या महामार्गामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button