रत्नागिरी

उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २२ वे संमेलन सिएटल येथे संपन्न होणार

६ ते ९ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम

संगमेश्वर दि. ३० ( प्रतिनिधी ):- उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २२ वे चार दिवसांचे संमेलन ६ ते ९ ऑगस्ट सिएटल येथील भव्य कन्व्हेन्शन सेंटर येथे भरेल. या अधिवेशनास २५००वर लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. भारताच्या सैन्यदलातील वैद्यकीय दलात ३७ वर्षे काम केलेल्या बालरोगतज्ञ ले. जनरल डॉ. माधुरी कानिटकर या संमेलनच्या प्रमुख पाहुण्या आहेत. चाणक्य प्रतिष्ठानचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी, लेखक निलेश ओक, आणि सुनंदन लेले यांची भाषणे संमेलनात होणार आहेत .

अमेरिकेतील विविध शहरातील मंडळे एकांकिका, नाटके, संगीताचे कार्यक्रम, ढोल ताशा स्पर्धा, पैठणी फॅशन शो, स्टॅन्ड अप कॉमेडी इत्यादी कार्यक्रम सादर करतील. गाण्याच्या आणि एकांकिकांच्या प्राथमिक स्पर्धेतील विजेत्या गटांची अंतिम स्पर्धा संमेलनात होईल. महाराष्ट्रातून डॉ. संजय उपाध्ये यांचा ‘घर करा रे प्रसन्न आणि चोवीस तास बिनधास्त’ हा कार्यक्रम, सलील आणि शुभंकर कुलकर्णी यांचा मुलांसाठी गाण्याचा कार्यक्रम, ‘ऑल द बेस्ट’ , ‘फोक आख्यान’ ही दोन नाटके’ आणि प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे यांचा ‘नाटकातले नाटक’ हे कार्यक्रम संमेलनात संपन्न होणार आहेत.

महाराष्ट्रातील आणि अमेरिकेतील उद्योजकांसाठी भव्य विक्री कक्ष संमेलनात असेल. त्यात पुस्तक विक्रेते ग्रंथाली , बांधकाम व्यावसायिक, टूर कंपनी, दागिने, मराठी खाद्यपदार्थ, कपडे विक्रेते, विमा कंपन्या आणि धर्मादाय संस्था सहभागी होतील. उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या दोन वर्षात ज्यांची पुस्तके प्रकाशित झाली अशा लेखकांना रंगमंचावर निमंत्रित करून ओळख करून देण्याची आणि त्यांची पुस्तके विक्री कक्षात ठेवण्याची मंडळाची योजना आहे अशी माहिती अमेरिका स्थित लेखक, संपादक, उद्योजक मोहन रानडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button