रत्नागिरी

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या कार्यकारिणी सदस्य, गायिका मुग्धा भट- सामंत यांची पंढरपुरात सुरेल अभंगवाणी

रत्नागिरी, दि. १५ जुलै : सायकल वारीनिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या सर्व सायकलस्वारांसाठी भारतातील प्रसिद्ध गायिका आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या कार्यकारिणी सदस्य सौ. मुग्धा भट- सामंत यांची सुरेल अभंगवाणी रंगली.

सुरवातीला युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक व मान्यवरांच्या हस्ते विठुरायाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन- पर्व चौथे या जवळपास ५० किमीच्या सायकल स्पर्धेची घोषणाही याप्रसंगी करण्यात आली. ही स्पर्धा ७ फेब्रवारी २०२७ रोजी भाट्ये- गावखडी- भाट्ये या मार्गावर होणार आहे.

सौ. मुग्धा सामंत यांनी सुरवातीला वारकरी बीज मंत्र ‘जय जय राम कृष्ण हरी’ या गजराने वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर रूप पाहता लोचनी, अबीर गुलाल उधळीत रंग, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, गजर हरिनामाचा, खेळ मांडियेला, जोहार मायबाप जोहार, असे अनेक सुंदर अभंग गात शेवटी ‘आदि देवा पांडुरंगा’ या भैरवीने सर्वांना एक सुरेल मेजवानीची अनुभूती दिली. या कार्यक्रमास निवेदन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कार्यकारिणी सदस्य प्रसाद देवस्थळी, पखवाजसाथ ज्ञानेश्वर दुधाणे, तबला माऊली खरात, हार्मोनियम वैभव कंगार, टाळ माऊली पिसे यांनी करत कार्यक्रमाला अधिक रंग भरला.

महाराष्ट्रातून आलेल्या हजारो सायकलिस्ट बंधू-भगिनींना अभंगवाणीची सुरेल मेजवानी मिळाली. या वेळी पंढरपूर आणि पंढरपूर पंचक्रोशीतील अनेक कला साधकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button