रत्नागिरी

रत्नागिरी येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

विल्ये दि. १४ जुलै (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रमुख अतिथी आरास अकॅडमी रत्नागिरीचे मार्गदर्शक ॲड. राकेश सत्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

सदर समारंभ रत्नागिरी शहरातील आंबेडकरवाडी” बुद्ध विहार” येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पोलीस उपअधीक्षक विलास भोसले, रत्नागिरी तालुका अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, सह सेक्रेटरी शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, शिक्षण समितीचे अध्यक्ष जयवंत कदम, सचिव काशिनाथ तांबे, महिला मंडळ अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, सचिव दिया कांबळे, संस्कार समितीचे सचिव रविकांत पवार गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष प्रकाश पवार व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण समितीचे अध्यक्ष जयवंत कदम गुरुजी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव काशिनाथ तांबे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वदीप भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शक ॲड. राकेश सत्वे यांनी विद्यार्थ्यांचा कल आवडीचे क्षेत्र आणि तयारी याबाबत खुली असलेली विविध क्षेत्रे याबाबत अत्यंत प्रभावी माहिती देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले.

विद्यार्थी व पालक यांच्या विविध प्रश्नांना शंकांना अतिशय प्रभावीपणे उत्तर दिली जिल्हा पोलीस माजी उपाधीक्षक विलास भोसले यांनीही शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांच्या हुशारी बाबत बालपणातील गुरुजींनी पालकांना पाठविलेले पत्र याविषयी अतिशय मोलाच व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.त्यानंतर इयत्ता दहावी आणि बारावी तसेच पदवीधर तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भेटवस्तू व गौरव पत्र देऊन यथोचित सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर सत्कारमूर्ती विद्यार्थी व पालकांनी बौद्धजन पंचायत समितीच्या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक करून संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले अध्यक्ष प्रकाश पवार यांनी मनोगत व्यक्त करताना बौद्धजन पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. जो प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण संघर्ष करण्यासाठी वाडी वाडीत संघर्ष न करता समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकजुटीने उभे राहून प्रतिकार करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. यासाठी बौद्धजन पंचायत समितीच्या विविध अंगी उपक्रमात सहभाग देऊन समितीचे काम अधिक गतिमान करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करूया, असे शुभेच्छामय सखोल मार्गदर्शन केले. आभार बौद्धजन पंचायत समितीचे सेक्रेटरी सुहास कांबळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button