रत्नागिरी

शिर्के प्रशालेत जीएस निवडणूक उत्साहात

विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ॲपद्वारे पार पडले मतदान

रत्नागिरी दि. ८ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत स्वराज्य व सांस्कृतिक विभागातर्फे जी.एस. म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठीची वार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे यंदाची संपूर्ण मतदान प्रक्रिया प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या संगणकीय ईव्हीएमद्वारे यशस्वीपणे राबविण्यात आली.

या निवडणुकीत इयत्ता दहावीतील प्रेम पाटील, संकेत पवार, शर्विल साळुंखे, प्रतीक पुजारी, मानस जाधव, सोहम देवरुखकर, गायत्री यादव, अरुण दुधाळे, रिद्धी लिंगायत आणि आदिती सावंत असे दहा उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीनंतर इयत्ता दहावी ‘अ’ मधील आदिती सावंत हिची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून, तर इयत्ता दहावी ‘इ’ मधील संकेत पवार यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड झाली.

या निवडणुकीत इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. निवडणुकीचे संपूर्ण नियोजन व कामकाज यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संगणकीय ईव्हीएम ॲपचा मतदानासाठी वापर करण्यात आला. अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख व शिक्षक विलास मुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गौरेश कोकरे, सुयश खापरे, सर्वेश नागले आणि तन्मय कोकरे या विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक हे ॲप विकसित केले. या उपक्रमामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि तंत्रज्ञानाधारित झाली.

प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. पवार तसेच पर्यवेक्षिका सौ. पी. एस. कांबळे यांनी निवडून आलेल्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीही विजयी उमेदवारांसह मतदानासाठी ॲप विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button