आंबा घाटात ३१ टन कोळशाच्या ट्रकला भीषण आग

देवरुख दि. २१ :- आंबा घाट परिसरात दगडी कोळशाने भरलेल्या एका १४ चाकी ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना आज (२१ जून) पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे ट्रकमधील तब्बल ३१ टन दगडी कोळसा जळण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. या आगीत ट्रकचे केबिन आणि तीन टायर जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, श्याम मोहिरे यांच्या मालकीचा १४ चाकी टाटा ट्रक ३१ टन दगडी कोळसा घेऊन जात होता. आंबा घाटातून प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास या ट्रकला अचानक आग लागली. पहाटे ३:४५ वाजता या घटनेची माहिती देवरुख अग्निशमन केंद्राला देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य ओळखून देवरुख नगरपंचायतीची अग्निशामक गाडी पहाटे ४:०७ मिनिटांनी घटनास्थळाकडे रवाना झाली. अवघ्या काही वेळातच, म्हणजेच पहाटे ४:५० वाजता पथक घटनास्थळी पोहोचले.
अग्निशमन दलाचे कर्मचारी सचिन साळवी, राज कुंभार आणि आकाश करंडे यांनी तात्काळ आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. पथकाने अथक परिश्रम घेत सकाळी ६:२० वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
ट्रकच्या पाठीमागील भागात असलेला ३१ टन दगडी कोळसा सुरक्षित वाचवण्यात यश आले. आगीची तीव्रता जास्त असल्याने ट्रकचे केबिन आणि तीन टायर जळून खाक झाले.



