मालघर येथे विहिरीत पडलेल्या दोन मगरींची वनविभागाकडून यशस्वी सुटका

चिपळूण दि. १८ :- तालुक्यातील मालघर गावातील टेपवाडी येथे पाणी नसलेल्या सुमारे १० फूट खोल पडीक विहिरीत पडलेल्या दोन मगरींची वन विभागाच्या बचाव पथकाने धाडसी मोहीम राबवून सुखरूप सुटका केली. त्यानंतर दोन्ही मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी टेपवाडी परिसरातील एका पडीक विहिरीत दोन मगरी पडल्याचे प्रकाश लटके यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती वनरक्षक राहुल गुंठे यांना दिली. माहिती मिळताच चिपळूण वन परिमंडळाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
वन कर्मचाऱ्यांनी शिडीच्या साहाय्याने विहिरीत उतरून पाहणी केली असता त्यातील एक मगर सुमारे ९ फूट तर दुसरी ७ फूट लांबीची असल्याचे आढळून आले. या बचाव मोहिमेत वन कर्मचाऱ्यांनी धाडसाने काम करत दोन्ही मगरींना एकामागोमाग सुरक्षितपणे बाहेर काढले. ग्रामस्थांच्या सहकार्याने मगरींची तपासणी करण्यात आली. दोन्ही मगरी पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
ही मोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक प्रियंका लगड आणि वन परिक्षेत्र अधिकारी जितेंद्र गुजले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले, दत्ताराम सुर्वे तसेच अजय बडदे व वाहनचालक नंदकुमार कदम यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला.

