नवीन गॅस जोडणी प्रक्रिया बंद; दोन सिलेंडर बुकींगमध्ये ठराविक दिवसांचे अंतर बंधनकारक

रत्नागिरी, दि. १९ : नवीन गॅस जोडण्या (Gas Connections) देण्याची प्रक्रिया सध्या संपूर्ण राज्यभरात बंद आहे. गॅस कंपन्यांना या संदर्भात थेट शासनाकडूनच निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रमाणशीर वितरणाच्या दृष्टीने वेळोवेळी गॅस एजन्सींना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केला आहे.
आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात घरगुती व व्यावसायिक सिलेंडरच्या वापरावर शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले होते. या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरचा तुटवडा भासू नये आणि सिलेंडरचे वाटप योग्य प्रमाणात व्हावे, यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे. या नियमानुसार, ग्राहकांसाठी दोन सिलेंडरच्या बुकींगमध्ये ठराविक दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
सध्याची स्थिती
नवीन गॅस जोडण्यांवर तात्पुरती बंदी असली, तरी जुन्या आणि नियमित ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जिल्हा पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार:
नवीन गॅस जोडणी देण्याची प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार पूर्णपणे बंद आहे.
गॅस कंपन्यांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आहेत.
मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात नियमित सिलेंडर स्टॉकची आवक होत आहे, ज्यामुळे सध्याच्या ग्राहकांना पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होत आहे.
गॅस वितरणात पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग सातत्याने गॅस एजन्सींच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.


