शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक

रत्नागिरी, दि. १९ : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत.
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, एस.टी. महामंडळ आणि विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शाळा आणि वाहन चालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध विभागांना खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या:
कागदपत्रांची वैधतेची तपासणी: शालेय परिवहन समितीच्या माध्यमातून स्कूल वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस), विमा, आणि चालकाचा परवाना (लायसन्स) या सर्व वैध कागदपत्रांची नियमित तपासणी करावी.
माहिती फलक व थांबे: सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकी संदर्भात माहिती देणारे बोर्ड शाळेच्या वाहनतळावर प्रदर्शित करावेत, तसेच वाहनांचे थांबे निश्चित करावेत.
नियमबाह्य वाहतुकीवर कडक कारवाई: शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली आणि माननीय न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर तसेच अवैध व धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या दोषी वाहनांवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रस्ते सुरक्षा आणि पायाभूत सुविधा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेसमोरील रस्त्यांवर अपघात टाळण्यासाठी खालील उपाययोजना करण्याचे आदेश रस्ते यंत्रणांना देण्यात आले आहेत:
सर्व शाळांसमोरील रस्त्यांवर गतिरोधक (Speed Breakers) आणि रंम्बलर स्ट्रिप्स बसवणे.
योग्य ठिकाणी इशारा फलक (Cautionary Boards) लावणे.
पोलीस व परिवहन विभागाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची अचानक व काटेकोर तपासणी करणे.
एस.टी. महामंडळ व शैक्षणिक सहलींबाबत निर्णय
एस.टी. बसेसचे नियोजन: ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांच्या मागणीनुसार आणि वेळेनुसार जादा बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आल्या आहेत.
सहलींसाठी नियम: सर्व शाळांनी शैक्षणिक सहली किंवा क्रीडा महोत्सवांसाठी केवळ अधिकृत स्कूल बसेस अथवा एस.टी. महामंडळाच्या बसेसचाच वापर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
पालकांना आवाहन:
प्रशासनाने पालकांनाही आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवताना अथवा घरी आणताना केवळ अधिकृत आणि सुरक्षित वाहतूक पर्यायांचाच (स्कूल बस/व्हॅन) वापर करावा, कोणत्याही अनधिकृत वाहनातून प्रवास करू देऊ नये.


