रत्नागिरी

रायगडावर ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा

'भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन' म्हणून लोकोत्सव : सौ चैत्राली कारेकर

रायगड दि. ३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 5 व 6 जून 2026 रोजी भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित हा सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडणार आहे.

‘भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन’ 

6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. यवनी सत्तेच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणारा हा दिवस ‘भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन’ म्हणून साजरा केला जातो. हजारो मावळ्यांच्या बलिदानातून स्वराज्याचे स्वप्न साकार झाले आणि सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची ग्वाही दाहीदिशांना फिरली.

यंदाचे मुख्य आकर्षण

‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे मुख्य आकर्षण असणार आहे.

दोन दिवसीय कार्यक्रम

शुक्रवार, 5 जून रोजी दुपारी 3:30 वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊ साहेबांच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्यास प्रारंभ होईल. दुपारी 4 वाजता युवराजांचे भव्य स्वागत व नाणे दरवाजातून पायी गड चढण्यास सुरुवात. सायंकाळी होळीच्या माळावर ढोल-लेझीम, रात्री राजसदरेवर शिवशाहीरांचा जागर व शिरकाई मंदिरात गोंधळ होईल.

शनिवार 6 जून रोजी मुख्य सोहळा

सकाळी 7 वाजता नगारखान्यावर ध्वजारोहण. सकाळी 10 वाजता युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस व सिंहासनाढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक होईल. त्यानंतर युवराजांचे शिवभक्तांना संबोधन. सकाळी 10:30 वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ होऊन जगदीश्वर मंदिरात पालखी पोहोचेल. दुपारी 12:15 वाजता वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येईल.

‘जागर शौर्य भक्तीचा’ या ब्रीदवाक्याखाली होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास लाखो शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रशासन व समितीतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शिवभक्तानी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या उपाध्यक्षा सौ. चैत्राली चेतन कारेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button