रत्नागिरी

जयगड पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातबॉम्बचा स्फोट; महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब हस्तगत

रत्नागिरी दि. २० :- तालुक्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाटद जांबारी फाटा येथे आज सकाळी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. मोकळ्या जागेत लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा अज्ञात इसमाने उघड्यावर टाकलेल्या गावठी हातबॉम्बशी संपर्क आल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोटात महिला गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल २९ जिवंत गावठी हातबॉम्ब जप्त केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७ वर्षे, रा. वाटद खंडाळा, जांबारी फाटा) या आज सकाळी ०६.४५ वाजण्याच्या सुमारास जांभळी फाटा येथील ‘भूत बंगला’ परिसराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बांबूची लाकडे जमा करण्यासाठी गेल्या होत्या. लाकूड तोडत असताना, त्या जागेवर कोणीतरी अज्ञात इसमाने उघड्यावर टाकलेल्या गावठी हातबॉम्बला त्यांचा अचानक हात लागला. हात लागताच बॉम्बचा जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात सौ. रेश्मा सुर्वे यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.

घटनास्थळी २९ जिवंत हातबॉम्ब सापडले!

घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. या पथकांच्या मदतीने घटनास्थळाचा सखोल पंचनामा करण्यात आला असता, तिथे आणखी तब्बल २९ जिवंत गावठी हातबॉम्ब मिळून आले. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट व तपास

घटनेची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरीचे मा. अप्पर पोलीस अधीक्षक आणि मा. डी.वाय.एस.पी. श्री. माईनकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.

२९ जिवंत बॉम्ब नष्ट

घटनास्थळी मिळालेले २९ जिवंत गावठी हातबॉम्ब अत्यंत धोकादायक असल्याने, पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत न्यायालयाकडून ते नष्ट करण्याची परवानगी मिळवली. त्यानंतर सुरक्षित ठिकाणी हे सर्व जिवंत बॉम्ब नष्ट (डिफ्यूज) करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे.

अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजि. नंबर २८/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५(अ), १२५(ब), २८८ सह भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम (Explosive Substances Act) कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड्यावर अशा प्रकारे जीवघेणे बॉम्ब टाकणारा तो अज्ञात इसम कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता, याचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button