रत्नागिरी

श्री स्वामीसुत महाराजांच्या पादुकांचे आडिवरे येथील तावडे भवनात आगमन

रत्नागिरी दि. १० ऑगस्ट : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मानसपुत्र आणि स्वामी सांप्रदायातील थोर संत श्री स्वामीसुत महाराज (हरिभाऊ दाजीबा तावडे) यांच्या पादुकांचे आडिवरे (ता. राजापूर) येथील तावडे भवन येथे सवाद्य स्वागत आणि पूजन करण्यात आले.

स्वामीसुत यांच्या पादुका १६० वर्षांत प्रथमच तावडे भवन येथे आणण्यात आल्या. स्वामी समर्थांच्या कृपाछायेत अध्यात्माचा प्रसार करणारे श्री स्वामीसुत महाराजांचे जीवन गुरुभक्ती, सेवा, त्याग आणि अध्यात्माचा संदेश देणारे आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या स्वामी चरित्र सारामृतात १६ ते १८ अशा तीन अध्यायात स्वामीसुत यांचे वर्णन करण्यात आले आहे.

तावडे भवन येथे कुलदैवत श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर उभारण्यात येत आहे. श्रींच्या पादुकांचे पूजन करून या मंदिरावर आढे चढवण्याचा धार्मिक कार्यक्रम झाला. याप्रसंगी यजमान म्हणून आर्किटेक्ट संतोष तावडे व सौ. सिद्धी तावडे यांनी काम पाहिले. आजचा हा सोहळा अध्यात्मिक व तावडे कुलोत्पन्नांसाठी दुग्धशर्करा योग ठरला. तावडे हितवर्धक मंडळाचे पदाधिकारी दिनकर तावडे, सतीश तावडे, सुहास तावडे, अतुल तावडे, प. पू. मौनी महाराज (नागपूर) तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मुंबईपुरी गादीचे मठाधिपती विजय नलावडे आणि श्री स्वामीसुत महाराज यांचे वंशज आदी याप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर तावडे हितवर्धक मंडळातर्फे प. पू. मौनी महाराज, मठाधिपती विजय नलावडे यांचा सन्मान शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. लवकरच श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे काम पूर्ण होऊन त्याचा कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे तावडे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या पवित्र कार्यक्रमाप्रसंगी मठाधिपती विजय नलावडे यांनी सांगितले की, स्वामीसुतांची मुंबापुरीत गादी स्थापन करण्याचं भाग्य स्वामी महाराजांनी दिलं. महाराजांच्या पादुका तावडे भवनात आल्या, इथे त्यांचं विधीवत पूजन करण्यात आले, तसेच आडिवऱ्याला श्री महाकाली मातेच्या मंदिरामध्ये भेट देण्यात आली. तावडे भवन व तावडे मंडळाची किर्ती जगभर पसरू दे, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

आर्किटेक्ट संतोष तावडे म्हणाले की, आजचा दिवस तावडे कुलबांधवांसाठी मोठ्या भाग्याचा दिवस आहे. २०१८ मध्ये तावडे वाड्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. आढे ठेवण्याच्या कार्यक्रमाला स्वामीसुत महाराजांच्या पादुकाही येणे म्हणजे धार्मिकदृष्ट्या दैवी अधिष्ठान लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button