
रत्नागिरी दि. १० ऑगस्ट :- इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत असताना रत्नागिरीच्या अविराज गावडे यांने आता हंड्रेड बॉल फॉरमॅटमध्ये सुद्धा आपली चमक दाखविली आहे.
भारतातील IPL सारखीच इंग्लंडमध्ये ‘The Hundred’ ही प्रतिष्ठीत स्पर्धा खेळवली जाते. त्यामध्ये प्रत्येक षटक हे पाच बॉलचे असते. अशी एकूण१०० बॉलची एक इनिंग असते. अशा या ‘The Hundred’ स्पर्धेच्या धर्तीवर सुरु असलेल्या ब्रिटीश तमिळ क्रिकेट लीगच्या (BTCL) च्या ‘Chera Cup’ च्या पहिल्याच मॅचमध्ये अविराजने दमदार अष्टपैलू कामगिरी केली आहे.
अविराजने ‘Valvai Blue’ या संघातर्फे फलंदाजी करताना ३५ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या व आपल्या संघाला १४७ रन्सची धावसंख्या उभारण्यात मोलाचे योगदान दिले.
तसेच गोलंदाजी करताना अविराजने २० बॉलमध्ये ०.८० च्या सरासरीने फक्त १६ रन्स दिल्या व ३ विकेटस् घेतल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. उपस्थित सर्व मान्यवर, खेळाडू व प्रेक्षकांनी अविराजच्या या अष्टपैलू कामगिरीचे भरभरून कौतुक केले.
सध्या चालू हंगामामध्ये अविराजने काउंटी क्रिकेट लीगमध्ये चमकदार कामगिरी करत तीन वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.
या स्पर्धेत अविराजने चमकदार कामगिरी करत आपल्या भारताचे, रत्नागिरी जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे.



