World Urban Forum 2026 साठी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना संयुक्त राष्ट्रांकडून अधिकृत निमंत्रण

रत्नागिरी दि. १५ : – रत्नागिरी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना संयुक्त राष्ट्रांच्या मानव वस्ती कार्यक्रमाकडून (UN-Habitat) मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. अझरबैजानची राजधानी बाकू येथे आयोजित करण्यात येणाऱ्या World Urban Forum 2026 या जागतिक शहर विकास परिषदेसाठी त्यांना अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या या निमंत्रणामुळे रत्नागिरीच्या विकास मॉडेलची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असल्याचे मानले जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ₹१८३० कोटींच्या व्हिजन प्लानला मंजुरी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या नेतृत्वामध्ये मिलिंद कीर यांचे नाव अग्रस्थानी राहिले आहे. महाराष्ट्रातील मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाल्याने रत्नागिरीसाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
दरम्यान, सध्याच्या इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अझरबैजानची राजधानी बाकू हे तेहरानपासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर असल्याने सुरक्षिततेचा विचार करून मिलिंद कीर यांनी प्रत्यक्ष परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते या जागतिक परिषदेत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


