रत्नागिरी

देवरुख भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळीचा तडाखा; आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

देवरुख दि. ७ ( सुरेश सप्रे) :- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुखच्या आसपास भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून, ऐन हंगामात असलेल्या आंबा पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सुद्धा याच तारखेला पावसाने हजेरी लावली होती, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

पाच वाजता पावसाचा थरार

दिवसभर प्रचंड उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि पुढील तासभर पावसाचा जोर कायम होता. तालुक्यात अनेक भागात पाऊस झाला असला तरी देवरुख. काटवली. हरपुडे ,कर्ली देवघर. कीरडूवे निवे आणि देवळे परिसरात पावू अधिक होता.

आंबा व काजू बागायतदार संकटात

सध्या कोकणात आंबा काजू हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच या पावसाने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. पावसामुळे झाडांवरील तयार आंबा गळून पडला असून, अनेक ठिकाणी फळांवर डाग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वीजपुरवठा खंडित, अंधाराचे साम्राज्य पसरले आहे 

पावसाला सुरुवात होताच खबरदारीचा उपाय म्हणून आणि अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक गावांमध्ये लाईट नसल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

योगायोग की निसर्गाचे चक्र?

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी सुद्धा याच दिवशी म्हणजे ७ मे रोजी संगमेश्वर तालुक्यात असाच अवकाळी पाऊस झाला होता. एकाच दिवशी सलग दोन वर्षे पाऊस पडल्याने निसर्गाच्या या बदलत्या चक्राबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button