हभप रोहिणी माने- परांजपे यांच्या कीर्तन रंग महोत्सवाला शेकडोंची गर्दी

रत्नागिरी दि. ३ :- अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त येथे आयोजित कीर्तनकार ह. भ. प. सौ. रोहिणी माने- परांजपे यांच्या कीर्तनाच्या पहिल्या दिवशी शेकडो भाविकांची गर्दी झाली. ही कीर्तने अजून दोन दिवस ४ व ५ जून रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत जयेश मंगल कार्यालयात रंगणार आहेत.
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, वात्सल्य- स्नेह यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जयेश मंगल पार्क आणि खल्वायन यांच्या सहकार्याने याचे आयोजन केले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन हभप रोहिणी परांजपे यांनी दीप प्रज्वलनाने केले. या वेळी जयेश मंगल पार्कच्या संचालिका सौ. कल्याणी मलुष्टे, चित्पावन मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, पावस येथील राम मंदिराचे आबा चिपळूणकर, खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, अविनाश काळे उपस्थित होते. चित्पावन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी निवेदन केले. कीर्तनात ऑर्गनची साथ कौस्तुभ परांजपे आणि तबलासाथ अमेय हर्डीकर यांनी केली.
रोहिणीताईंच्या भक्तीरसपूर्ण रसाळ वाणीतील कीर्तनांचा आस्वाद श्रोत्यांनी घेतला.

