महाराष्ट्ररत्नागिरी

केंद्रात मोबाईल, कॅमेरा नेण्यास मनाई; मतदारांना फोटो आयडी ओळखपत्र आवश्यक – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी रविवारी मतदान

रत्नागिरी, दि. २३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबईची निवडणूक रविवार 26 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वा. या वेळेत होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील शरीर रचना शास्त्र विभाग खोली क्र.1 आणि खोली क्र.2 अशी दोन मतदान केंद्रे आहे. मतदान केंद्रात मोबाईल, कॅमेरा, वायरलेस संच नेण्यास मनाई असून, मतदारांना ओळख पटविण्यासाठी खालील नमूद पुरविण्यापैकी कोणताही एक पुरावा मूळ प्रतीत फोटो आयडी प्रुफसह सादर करावा लागणार आहे, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कळविले आहे.

निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 556 मतदार आहेत. ही निवडणूक एकूण 60 उमेदवार लढवित असून, त्यापैकी 9 उमेदवारांच्या मतपत्रिकेतील नावासमोरील चौकटीत X करुन 9 उमेदवारांना मत देण्याचे आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीर रचना शास्त्र विभाग, तळमजला खोली क्र.1 आणि खोली क्र.2 अशी दोन मतदार केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. १ ल्या केंद्रात 1 ते 280, 281 ते 556 मतदारांसाठी दुसरे मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे.

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कर्तव्यार्थ नेमलेल्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी भ्रमणध्वनी, ताररहित फोन, वायरलेस संच, कॅमेरा इ. मतदान केंद्रात नेण्यास मनाई आहे. मतदारांना आपली ओळख पटविण्यासाठी पुढील पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मूळ प्रतीत फोटो आयडी प्रुफसह सादर करावा लागणार आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र या नोंदणी प्रमाणपत्रावर छायाचित्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी अन्य छायाचित्र असलेले ओळखपत्र, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले ओळखपत्र, भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी जी ओळखपत्रे ग्राह्य धरण्यास मान्यता दिलेली अशी छायाचित्रासहीत ओळखपत्रे खालीलप्रमाणे-

मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफीसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमीटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र.

मतदारांनी वरीलप्रमाणे नमूद दस्तऐवजापैकी एक दस्तऐवजाची मूळ प्रत मतदानाच्या वेळी मतदान केंद्राध्यक्षांना सादर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button