
रत्नागिरी, दि. १० :- कोकणातील शेतीला रासायनिक खतांच्या विळख्यातून बाहेर काढून शाश्वत बनवण्यासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोकण विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात पार पडली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला कोकण विभागातून १ हजार २५० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून नैसर्गिक शेतीचे तंत्र समजून घेतले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ‘नैसर्गिक शेती’ या विशेष माहिती पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: आंबा, काजू आणि भातशेतीवर भर
कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात अहमदाबाद येथील बन्सी गीर गो-शाळेचे गोपाळभाई सुतारिया यांनी नैसर्गिक शेतीचे बारकावे आणि त्याचे महत्त्व विशद केले. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल माळी आणि डॉ. अशोककुमार चव्हाण यांनी कोकणातील मुख्य पिके असलेल्या आंबा, काजू, मसाले पिके, भात आणि नाचणी यामध्ये नैसर्गिक शेतीचा प्रत्यक्ष अवलंब कसा करावा, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. सुनील चोत्कर (संचालक, पुणे): नैसर्गिक शेतीचे शासकीय धोरण, शिवाजी आमले (विभागीय कृषी सहसंचालक): कार्यशाळेची पार्श्वभूमी व उद्देश, संशोधन संचालक डॉ. बा.सा.को.कृ.वि.दापोली डॉ. प्रशांत शहारे व संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेश ठोकळ: शेतीतील भविष्यातील संधी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात कौस्तुभ देशपांडे यांनी गो-आधारित शेतीची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या शंकांचे जागेवरच निरसन
नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण कसे करावे, यावर प्रशांत नाईकवाडी यांनी सविस्तर माहिती दिली. अनेक शेतकऱ्यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले, तर काहींनी आपल्या शंका मांडल्या, ज्यांचे तज्ज्ञांनी समाधानकारक निरसन केले.
नैसर्गिक शेती ही काळाची गरज
रासायनिक शेतीला सक्षम पर्याय म्हणून नैसर्गिक शेती ही भविष्यातील काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० पर्यंत चाललेल्या या कार्यशाळेमुळे कोकणातील शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह पहायला मिळाला.



