रत्नागिरी

नैराश्य दूर करणारे पुस्तक ‘ दिले घेतले ’!

महिला दिन विशेष

काही माणसं त्यांच्यावर बालपणी होणाऱ्या संस्कारातून अशी काही घडत जातात की, त्यांचा जन्म जणू लढण्यासाठी आणि संकटांचा सामना कारण्यासाठीच झालेला असतो . संकट कितीही मोठे असो, त्याच्यापुढे हार मानायची नाही, अशा जिद्दीने त्यांची वाटचाल सुरु असते. मग आयुष्यात एक दिवस असा येतो की, संकटाना देखील त्यांच्यापुढं हार मानावी लागते. जीवन प्रवासात नेहमीच सकारात्मक विचार केल्याने मन कणखर बनते. अशा कणखर मनातूनच नवंनवीन संकल्पना जन्म घेतात. माणसाच्या जीवनात नेहमीच विविध घडामोडी घडून नवंनवी स्थित्यंतरं येत असतात. प्रत्येक जीवनप्रवास हा संघर्षमय असतोच असं नाही. अथवा संघर्ष केला असेल तर, त्यावर शांतपणे मात केली असेल, असंही नाही. अशावेळी संघर्षमय जीवनातील नैराश्य दूर करण्यासाठी काहीतरी ‘ दिले घेतले ’ पाहिजे. यामध्ये प्रश्न निर्माण होतो देणारं कोण आणि घेणारं कोण ? मात्र या प्रश्नाचे उत्तर प्रयोगशील आदर्श शिक्षिका आणि निर्मळ मनाच्या लेखिका आशा पैठणे यांनी चपराक प्रकाशनच्या सहकार्याने ‘ दिले घेतले ’ या आपल्या आत्मकथनातून दिलं आहे. या आत्मकथनाचे मोजक्या शब्दात वर्णन करायचं झाल्यास ‘ नैराश्य दूर करणारे पुस्तक ’ असंच करावं लागेल.

ज्यांच्या नावातच आशा आहे, त्या संघर्षमय जीवनात देखील निराश कशा होतील ? आशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निराशा आहे. मराठी शाळेत असताना समानार्थी विरुद्धार्थी शब्दांची प्रत्येकाला ओळख झालेली असते. जीवनात आशा आणि नीराशा या दोन्ही परिस्थितीचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. असं असलं तरी, निराशेच्या प्रसंगी खचून जाणाऱ्या व्यक्तीचा जीवनप्रवासात निभाव लागत नाही. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटं आली की, ती हातात हात घालून येतात. एका संकटातून बाहेर पडून सारं सुरळीत होईपर्यंत दुसरं संकट हजर असतं. अशावेळी त्यातून सहिसलामत बाहेर पडायचं असेल तर, आवश्यक असते ती, दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा ! ‘ दिले घेतले ’ या आत्मकथनाच्या लेखिका आशा पैठणे यांच्याकडे हे सारं ओतप्रोत भरलेलं होतं म्हणूनच त्या जीवन प्रवासातील सर्व संकटावर धैर्याने मात करु शकल्या. शालेय जीवनापासूनच आशाताई यांच्यासमोर संकटाची मालिका उभी राहिली. शिक्षणासाठी त्यांना आई-वडिलांपासून दूर राहावं लागलं. शिक्षण घेत असताना तब्येत बिघडल्याने शिक्षणातही काही काळ खंड पडला. मुलीने शिकावं यासाठी आई-वडील ठामपणे पाठीशी उभे होते. वडील कोणाच्याही उपकाराखाली न राहणारे तर, आई जणू वात्सल्य मूर्ती. या दोघांच्याही संस्काराचा आशाताईंवर मोठा पगडा होता. आई-वडिलांच्या शब्दाबाहेर जायचं नाही, या निश्चयाने त्यांनी त्यांच्या प्रत्येक निर्णयाला होकार दिला. बालपणापासूनच आशाताईंना परिस्थितीशी झगडावं लागलं. असं असलं तरीही, त्यांचं कुटुंब नेहमीच स्वाभिमानानेच वाटचाल करत आलं.

घरची परिस्थिती थोडी सुधारत असतानाच एका भामट्याने घरातील सर्व सोन्याची गोड बोलून लूट केली. आशाताईंच्या आई-वडिलांनी कधीच कोणावर अविश्वास दाखवला नाही. त्यांच्या या स्वभावाचा त्यांना अनेकदा फटका बसला असला तरी, त्यांनी कधी पश्चाताप करत राहणे पसंत केले नाही. अशाताईच्या आई-वडिलांनी देखील परिस्थितीशी सामना करत आणि अडचणींवर मात करत नेहमी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. भविष्यात आई वडिलांच्या पायावर पाऊल ठेवून आशाताईंनी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. आशाताई या अभ्यासू , मनात नेहमी जिज्ञासा असणाऱ्या, शब्दाला पक्क्या, सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या आणि संकटाला कधीही न घाबरणाऱ्या असल्याने त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारण्याचे नक्की केले आणि डीएड करण्याचा निर्णय घेतला. या शिक्षणातही आलेल्या संकटावर त्यांनी लिलया मात केली. आशाताईंचा विवाह ठरला आणि विवाहप्रसंगी त्यांनाच माहीत नसलेल्या नावाने आलेल्या अभिनंदननाच्या तारेने त्यांच्या वैवाहिक जीवनाची घडी विस्कटली ती कायमचीच. आशाताईंच्या पतीने नाहक गैरसमज करून घेतला आणि त्यांना याबाबत काही खुलासा करण्याची संधी देखील दिली नाही. याचा त्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. आशाताईंचे वैवाहिक जीवन म्हणजे, एकापाठोपाठ एक संकटांची मालिका आणि कमालीचा मनस्ताप देणारे ठरले. अशाही अवस्थेत आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी या साऱ्या हालअपेष्टा सहन केल्या. मात्र काही वर्षांनंतर हे सारं असह्य झालं आणि त्यांनी आपल्या वडिलांना पत्र पाठवून सासरी बोलावून घेतलं. वडिलांसोबत त्या घरी निघून आल्या त्या कायमच्याच. अशा स्थितीतही त्यांनी या परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याचा निर्णय घेतला. वडीलांवर अन्य भावंडांची देखील जबाबदारी होती. डीएड पूर्ण झालेलं असल्याने घरात बसून राहण्याऐवजी वडिलांच्या संसाराला हातभार लावावा या दृष्टिकोनातून आशाताईंनी नोकरी शोधणे सुरू केले.

वाचन आणि लेखन याची कमालीची आवड असल्याने आशाताईंनी नांदेड येथील गोदावरी टाइम्स या वर्तमानपत्रात नोकरी पत्करली. या वर्तमानपत्राच्या संपादक सूर्यकांता पाटील यांच्याजवळ आशाताईंची घनिष्ठ मैत्री झाली. आशाताई त्यांना ताई म्हणू लागल्या. नांदेड येथे आशाताईंचा राहण्याचा प्रश्न होता, सूर्यकांता पाटील यांनी तो चुटकीसरसा सोडवून त्यांची आपल्याच घरी राहण्याची सोय केली. सूर्यकांता पाटील यांच्या दोन मुलांची आशाताईंजवळ चांगलीच गट्टी जमली. सलग दोन महिने आशाताई सूर्यकांता पाटील यांच्या घरी राहिल्यानंतर त्यांनी अन्य ठिकाणी खोली शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र एकट्या स्त्रीला कोणी खोली देण्यास तयार होत नव्हते. परिणामी आशाताईंनी आपला मुक्काम सूर्यकांता पाटील यांच्याच घरी कायम ठेवला. गोदावरी टाइम्स च्या कार्यालयात बसलेल्या असताना एकदा सूर्यकांता पाटील यांना नगरपालिकेतून शिक्षक भरतीसाठी फोन आला. सूर्यकांताताई, कोण डीएड झालेलं परिचित आहे कां ? असे विचारत असतानाच आशाताईंनी आपण डीएड पूर्ण केल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकून सूर्यकांताताई त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. आजवर तू ही बाब मला का सांगितली नाहीस ? असे त्यांनी आशाताईंना विचारले. आपण सांगत असाल तर, मी ही शिक्षकी पेशाची नोकरी करण्यास तयार असल्याचे आशाताईंनी अभिमानाने सांगितले. तुझी कागदपत्रांची फाईल घेऊन ये, असे आशाताईंना सांगताच त्यांना ही फाईल गावी असल्याचे लक्षात आले. आपण आपली सर्व कागदपत्रे सोबत ठेवली नाही त्याची त्यांना यावेळी खंतही वाटली. अखेरीस गावी जाऊन सर्व कागदपत्र घेऊन ये, असे सूर्यकांता ताईंनी सांगितले आणि आशाताईंनी आपला प्रवास सुरू केला. यामध्ये देखील अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करत आशाताई आपली सर्व कागदपत्रे घेऊन सूर्यकांताताई यांच्याकडे दाखल झाल्या.

उत्तम मुलाखत देऊन आशाताईंनी रजा कालावधीतील शिक्षकी पेशाची नोकरी स्वीकारली. आयुष्यात मिळालेल्या या संधीचं नक्कीच सोनं करायचं, असा निर्णय त्यांनी पहिल्या दिवशी शाळेत पहिलं पाऊल ठेवताना घेतला होता. गोदावरी टाइम्स मधील सर्व कर्मचाऱ्यांवर आशाताईंचे अत्यंत स्नेहाचे नाते जुळले होते. येथील कर्मचाऱ्यांचा त्यांनी जड अंतकरणाने निरोप घेतला. काही कालावधीनंतर त्यांनी स्वतंत्र खोलीही पाहिली. शिक्षकी पेशा सुरू झाल्यानंतर त्यांच्या मनात असणारे वेगवेगळे उपक्रम राबवण्यास त्यांनी सुरुवात केली. रजा कालावधी संपल्यानंतर आशाताईंच्या नोकरीत जरी खंड पडला तरी, काही कालावधीनंतर त्यांना परत शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली ती मात्र कायमचीच. वीट भट्टी मधील मुलांना शाळेत आणणे, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांचा गुणात्मक दर्जा सुधारणे अशा विविध प्रयोगांसोबतच शाळेचा परिसर एखाद्या नंदनवनासारखा करण्यावर आशाताईंनी भर दिला. आपल्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी प्रत्येक उपक्रम राबवला. मुख्याध्यापक असलेल्या आशाताईंनी प्रत्येक उपक्रमात मिळालेलं यश हे आपलं एकटीच यश नसून यामध्ये सर्व सहकारी सहभागी असल्याचं प्रत्येक वेळी नमूद केलं. आशाताईंचं उत्तम काम पाहून त्यांची सर्व शिक्षा अभियानमध्ये अधिकारी म्हणून निवड झाली. मात्र येथे अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्याचा फटका त्यांना अनेक वेळा सहन करावा लागला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून त्यांच्यावर प्रसंगी अन्यायही केला. मात्र आशाताईंनी शांत राहून सर्व संकट आणि अडचणींचा धीरोदात्तपणे सामना केला. अशावेळी प्रशासनातील काही प्रामाणिक मंडळीनी त्यांना सहकार्य केले.

सर्व शिक्षा अभियानात अधिकारी पदावर काम करत असताना आशाताईंनी राबवलेले उपक्रम हे राज्यस्तरावर आदर्श उपक्रम म्हणून गणले गेले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक गरजू मुलांना, दिव्यांग मुलांना आशाताईंनी मदत मिळवून देण्यासाठी सर्व ते सहकार्य केले. याबाबत त्यांनी पुस्तकात नमूद केलेले काही किस्से अंगावर काटा आणणारे आहेत. सर्व काही व्यवस्थित, सुरळीत सुरु झालं असतानाच आशाताईंच्या पायाला गंभीर आजाराने गाठलं. आता आपल्याला चालणंही अशक्य होईल असं त्यांना वाटू लागलं. मात्र त्यांनी धीर सोडला नव्हता. त्यांच्यासोबत शिक्षणासाठी त्यांची भावंड देखील राहायला आली होती. या दरम्यान भावंडांची त्यांना खूप मोठी मदत झाली. गंभीर आजारातून उठून परत एकदा आपल्या कामकाजाला त्यांनी सुरुवात केली. पगार देणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुद्दामहून कसा त्रास दिला, याबाबतचे प्रसंग पुस्तकात वाचताना कमालीची चीड येते. सर्व शिक्षा अभियानातील प्रामाणिक कामाची पोचपावती देण्याऐवजी प्रशासनाने त्यांची परत एकदा मुख्याध्यापक म्हणून अन्य ठिकाणी बदली केली. शांतपणे प्रशासनाचा हा निर्णय स्वीकारून आशाताईंनी नव्या शाळेत पाऊल टाकलं खरं, मात्र तेथील सारं उकिरड्या सारखं वातावरण बघून आशाताईंनी ही एक नवी संधी मानली. सर्व सहकारी शिक्षकांना पहिल्याच दिवशी एकत्रित करून आपल्याला शाळेचा कायापालट करायचा आहे, असे आशाताईंनी निक्षून सांगितले. सर्व सहकाऱ्यांनी देखील यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच शाळा परिसर विकासाला सुरुवात करण्यात आली. यासाठी आशाताईंनी आपल्या परिचितांची मदत घेतली. प्रत्येकाने यासाठी त्यांना सहकार्याचा हात दिला. हळूहळू शाळेच्या परिसराचा कायापालट होऊ लागला. याच शाळेत आशाताईंनी ऑक्सिजन पार्क ही बागेची संकल्पना राबवली. याच ठिकाणी पक्षांसाठी घरट्यांची सोय केली. याची चर्चा शहरात सर्वत्र होऊ लागली. काही दिवसातच शाळेचं अंतर बाह्य रूप पालटलं आणि आशाताईंचं मन काहीसं शांत झालं. आयुक्तांनी शाळेला भेट दिल्यानंतर सुंदर शाळा हा उपक्रम शहरात राबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आशाताईंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे चीज झालं. आशाताईच्या शाळेला शहरात पहिला क्रमांक मिळाला. आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारा शिक्षक विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून शाळेचा कसा कायापालट करू शकतो, हे आशाताईंनी दाखवून दिले होते. आशाताईंना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांनी आपल्या पुस्तकात वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आशाताईंना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या जीवन प्रवासात आलेल्या संकटांच्या मालिकेने एक दिवस त्यांच्या आईची झालेली अवस्था सांगणारा प्रसंग वाचून डोळ्यात अश्रू उभे राहतात. एखाद्या शत्रूवरही अशी वेळ येऊ नये, असे प्रसंग आशाताईंच्या जीवनात आले. मात्र या सर्वांचा त्यांनी अत्यंत धैर्याने सामना केला. या पुस्तकाची पाठराखण प्रख्यात दिग्दर्शक लेखक, नाट्य – सिने अभिनेते अभिराम भडकमकर यांनी केली आहे. आपल्या भावंडांबद्दलही त्या खूप छान शब्दात व्यक्त झाल्या आहेत. आपण आयुष्यात जे काही झेललं ते सहनशक्तीच्या पलीकडलं होतं. तरीही या सर्वातून आपण कसा मार्ग काढला हे आजच्या पिढीला कळावं यासाठीच आशाताईंनी आपलं आत्मकथन लिहिलं आहे. विशेष म्हणजे हे आत्मकथन वाचून अनेकांनी आशाताईंना फोन केले. आपलं पुस्तक आमच्यासाठी दीपस्तंभ ठरलं याची कबुलीही त्यांनी दिली.

आशाताईंनी आज वयाची सत्तरी गाठली आहे. त्यांच्या आवाजावरून आपल्याला त्या सत्तर वर्षांच्या आहेत असं वाटणारही नाही , इतकं त्यांचं मन आजही तरुण आहे. दिले घेतले हे आत्मचरित्र लिहून झाल्यानंतर पुणे येथील चपराक प्रकाशनचे धडाडीचे संपादक घनश्याम पाटील यांनीही संहिता वाचली आणि आपण हे आत्मकथन लवकरात लवकर प्रकाशित करू, असं त्यांनी आशाताईंना आश्वासित केलं. पुस्तकात असणारा मजकूर हा समाजासाठी किती उपयुक्त आहे याचा गांभीर्याने विचार करून पुस्तकं प्रकाशित करणारे घनश्याम पाटील म्हणजे प्रकाशन क्षेत्रातील एक अवलिया आहेत. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी आशा पैठणे यांचे ‘ दिले घेतले ’ हे आत्मकथन प्रकाशित केले. या पुस्तकाचे सुंदर असे मुखपृष्ठ ज्योती घनश्याम यांनी साकारले आहे. चपराक प्रकाशनकडेही दिले घेतले या आत्मकथनाला खूप मोठी मागणी होत आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघतील, असे घनश्याम पाटील यांनी अभिमानाने नमूद केलं आहे.

▪️पुस्तक परीक्षण – जे. डी. पराडकर ९८९००८६०८६

*_____________________________*

▪️दिले घेतले ( आत्मकथन )

▪️लेखिका : आशा पैठणे

▪️प्रकाशक : चपराक प्रकाशन

▪️किंमत : ४०० / –

▪️पृष्ठ : २४०

▪️पुस्तकासाठी संपर्क : ७०५७२९२०९२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button