रत्नागिरी

रत्नागिरीत मानसशास्त्रातील उच्च शिक्षणाची संधी; गोगटे महाविद्यालयात एम. ए. मानसशास्त्र अभ्यासक्रम सुरू

रत्नागिरी दि. १० : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या एम. ए. मानसशास्त्र या अभ्यासक्रमामुळे कोकणातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मानसशास्त्रातील दर्जेदार आणि संशोधनावर आधारित उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना समुपदेशन, संशोधन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करता येईल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

मानसशास्त्र या विषयाची वाढती व्याप्ती आणि त्यातील करिअरच्या संधी पाहता दिवसागणिक या विषयाचा अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून एम. ए. मानसशास्त्र हा नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी त्यांनी सांगितले की, महाविद्यालयाला मिळालेल्या स्वायत्ततेच्या दर्जामुळे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशनपासून एम.एस्सी. (डेटा सायन्स) आणि एम. बी. ए. असे चार नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले.

कोकणात मानसशास्त्र या विषयातील उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे या विषयात करियर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई-पुणे, कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जावे लागत होते. कुटुंब, घरापासून दूर राहून शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक, निवासाच्या तसेच अन्य अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना या विषयातील दर्जेदार, संशोधनाधारित उच्च शिक्षणाच्या संधीची दारे खुली झाली आहे. हा अभ्यासक्रम सुरू करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील बहुधा पहिले महाविद्यालय असावे, असे प्राचार्य डॉ. साखळकर यांनी सांगितले.

अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता ६० आहे. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर याची माहिती पाहता येईल. अधिक माहितीसाठी कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. सीमा पवार आणि प्रा. साहिल बोथरे यांच्याशी अथवा psychology@gjcrtn.ac.in या ई-मेलवर संपर्क साधावा. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सुरु करण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमाचा लाभ कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

विविध क्षेत्रात संधी

मानसशास्त्र अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना चिकित्सक, समुपदेशन, सामाजिक आणि औद्योगिक अशा मानसशास्त्रातील विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून सखोल शिक्षण मिळणार आहे. त्यासोबतच संस्था–आस्थापनांमध्ये इंटर्नशिप, प्रायोगिक शिक्षण आणि क्षेत्रीय अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालये, शासकीय-बिगर शासकीय क्षेत्र, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात मानसिक आरोग्य तज्ज्ञ, समुपदेशक, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button