रत्नागिरीसामाजिक

रत्नागिरीत घुमणार शिवगर्जना; ‘शिवराज भूषण’ महानाट्यासह भव्य शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन

रत्नागिरी दि. १८ : रत्नागिरीकरांसाठी मार्च महिना खऱ्या अर्थाने ‘शिवमय’ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांचा पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘श्री शिवराज मंच’ तर्फे एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘शिवराज भूषण’ या भव्य महानाट्यासह शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले ‘शिवराज भूषण’ हे महानाट्य रविवार, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे सादर होईल. या महानाट्याची निर्मिती कवी भूषण यांनी लिहिलेल्या अजरामर काव्यावर आधारित आहे. कवी भूषण यांनी १६७१ मध्ये रायगडावर येऊन महाराजांच्या शौर्याचे वर्णन आपल्या साहित्यातून केले होते, तोच इतिहास आता ६० पेक्षा अधिक कलाकारांच्या माध्यमातून रंगमंचावर जिवंत केला जाणार आहे. महाराजांची युद्धनीती, त्यांचे शौर्य आणि अष्टप्रधान मंडळाचे चोख नियोजन प्रेक्षकांना या नाटकातून जवळून अनुभवता येईल.

केवळ नाटकच नव्हे, तर इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी २० ते २२ मार्च २०२६ दरम्यान एक विशेष शैक्षणिक आणि ऐतिहासिक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. सावरकरनाट्यगृहाच्या तळमजल्यावर सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनात शिवकाळात वापरली जाणारी तलवार, दांडपट्टा, ढाल यांसारखी महत्त्वाची शस्त्रास्त्रे आणि दुर्मिळ ग्रंथ एकाच छताखाली पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच, महाराजांच्या पराक्रमावर आधारित विविध पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीही येथे केली जाणार आहे.

श्री शिवराज मंचने या उपक्रमाद्वारे तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, केवळ पुस्तकात इतिहास वाचण्यापेक्षा तो डोळ्यांनी अनुभवण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान जागृत करणारा हा सोहळा रत्नागिरीतील रसिकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button