स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी ते पावस पायी पदयात्रा

रत्नागिरी दि. १५ : प. पू. स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त रविवारी सकाळी भरपूर थंडीच्या वातावरणात ॐ राम कृष्ण हरी, हरीपाठाचा गजर झाला. रत्नागिरी ते पावस या वीस किमीच्या मार्गावर शेकडो वारकऱ्यांची पायी पदयात्रा उत्साहात झाली. यंदा पदयात्रेचे २३ वे वर्ष होते.
जयस्तंभ येथून पहाटे ४.३० वाजता पदयात्रेला सुरवात झाली. दरवर्षीप्रमाणे शेकडो स्वामीभक्त यात सामील झाले. पांढरा झब्बा लेंगा, पांढरी टोपी घातलेले पुरुष, आणि पांढऱ्या साडी परिधान करून आलेल्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पहाटेच्या धुंद वातावरणात ॐ राम कृष्ण हरि नामस्मरण करीत आणि ज्ञानदेवांचा हरिपाठ गात स्वामीभक्त मार्गस्थ झाले. स्वामीभक्त अनंत आगाशे व सहकाऱ्यांनी ही दिंडी सुरू केली व ती अव्याहतपणे सुरू आहे. श्री स्वामी स्वरूपानंद सांगतात नाम घ्या तेच अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देईल. नामात सर्वकाही आहे. त्यामुळे आजची पदयात्रा समाधान देणारी होती, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
पारा घसरल्याने गेले आठ दिवस थंडी भरपूर प्रमाणात पडत आहे. तरीही आज पदयात्रेला शेकडो वारकऱ्यांची गर्दी झाली. सकाळचे धुके, भाट्याच्या समुद्राची गाज, गुलाबी थंडी अशा वातावरणात सुमधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गाणारी सर्व वारकरी मंडळी हळुहळू पुढे चालत होते. वारीमध्ये कोहिनूर हॉटेलनजीक व फणसोप हायस्कूल आणि रनपार पूल या तीन ठिकाणी विसावा घेण्यात आला. त्यानंतर वारी पावस येथे पोहोचली आणि मंदिरासमोर फेर धरून वारकऱ्यांनी स्वामी स्वरूपानंदांचा गजर केला. रत्नागिरी न्यूज नेटवर्क.अनेकांनी अभंग सादरीकरण केले. त्यानंतर स्वामींचे दर्शन घेतले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाकडून अल्पोपहाराची व्यवस्था केली. त्याचा आस्वाद घेऊन वारकरी पुन्हा रत्नागिरीत पोहोचले.
पदयात्रेसंबंधी आयोजक, स्वामीभक्त अनंज आगाशे म्हणाले की, हे पदयात्रेचे २३ वे वर्ष आहे. यावर्षीचे वैशिष्ट्य अगदी लहान तीन मुलं चालत होती, म्हणजे नवीन पिढीला सुद्धा आता गोडी लागायला लागलेली आहे. त्यामुळे पुढील अनेक वर्ष ही वारी निश्चितपणे आणि निश्चिंतपणे उत्तम चालू राहील. ओम साई मित्र मंडळ, फणसोप हायस्कूल यांनी विशेष सहकार्य केले. असे व्यक्ती, संस्थांनी हस्ते पर हस्ते मदत केली. गौरांगची मुलगी सुद्धा हट्टाने यावर्षी चालली. यंदा पदयात्रेला येणारच असा तिचा हट्ट होता. अशी अनेक मुलं असू शकतील तर ही पिढी तयार होते, हे निश्चितच सुखावह आहे.
मी गेल्या १० वर्षांपासून या पदयात्रेत चालतो आहे. स्वामी स्वरूपानंदांचे नाम घेत आणि पायी चालत चालत जाण्याचा अनुभव फारच समाधान व नवी उर्जा देणारा आहे. नेहमीच व्यवसाय, नोकरीच्या धकाधकीच्या जीवनात स्वामी नाम घेऊन आनंद मिळतो. दरवर्षी स्वामी जन्मोत्सवाच्या अगोदरच्या रविवारी दिंडी निघते. अनंत आगाशे व सहकाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन असते, असे स्वामीभक्त प्रवीण मादुस्कर यांनी सांगितले.



