शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २८ रोजी लोकमान्य टिळकांवर संगीत नाट्यमय कार्यक्रम

रत्नागिरी दि. २५ : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग- सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई) आयोजित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘लोकमान्य टिळक : सहस्त्ररश्मी सूर्याचा अवतार’ हा संगीत नाट्यमय कार्यक्रम दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि सादरीकरण खल्वायन संस्था करणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे.
ज्ञान, भक्तिपूर्ण कर्मयोग हेच भगवद्गीतेचे तात्पर्य आहे. हे सांगण्यासाठी मंडालेच्या तुरुंगात असतांना टिळकांनी गीतारहस्य लिहिले. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही गर्जना करणारे लोकमान्य टिळक. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्नसुध्दा बेधडक विचारत होते. त्याच कणखरपणाने बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी ते आंदोलनात उतरले आणि फाळणी रद्द केली. त्यांचे व्यक्तिमत्व आचार्य कुळीचे होते. त्यांना आणखी आयुष्य लाभले असते तर हिंदूधर्माचा इतिहास, भारतीय राष्ट्रीयत्व, भारताचा रामायणपूर्व इतिहास, शांकरदर्शन, हिंदू कायदा, शिवचरित्र असे ग्रंथ आकाराला आले असते. अखंड ज्ञानसाधना हा टिळकांचा श्वास होता आणि त्यांचे अस्तित्व सहस्त्रसूर्यांच्या तेजस्वी किरणांप्रमाणे प्रखर होते.
अशा या लोकमान्य टिळकांचे आणि रत्नागिरीचे हे एक अतूट नाते आहे. लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीमध्ये महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि खल्वायन या संस्थेचे आयोजन व सादरीकरणातून लोकमान्यांचे स्मरण हा एक सुवर्णयोग आहे.
या कार्यक्रमाचे लेखन केले आहे रत्नागिरीतील सुप्रसिध्द कादंबरीकार, संगीत नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी. आजचा आघाडीचा गायक चैतन्य गोडबोले (सांगली), गायिका मधुरा सोमण, प्रदीप तेंडुलकर, विनायक उर्फ राजू जोशी, मनोहर जोशी आणि खल्वायनचे कलावंत हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना संगीतसाथ देवाशीष बापट, पार्थ परांजपे, संकेत पाडळकर, राम तांबे आणि प्रसन्न प्रभूतेंडोलकर करणार आहेत. पार्श्वसंगीत राधा दाते, प्रकाशयोजना मंगेश लाकडे व रंगभूषा रामदास मोरे यांची आहे आणि नेपथ्य मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, संजय व सौरभ लोगडे, सुधाकर घाणेकर, अमित धांगडे साकारणार आहेत.
तरी सर्व रत्नागिरीकर, टिळकप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे वतीने खल्वायन या संस्थेने केले आहे.



