भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे ५ दिवस असहकार आंदोलन

रत्नागिरी दि. २४ :- भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून सामूहिक अर्जीत रजा टाकून असहकार आंदोलन पुकारले असून, यात जिल्ह्यातील ९६ टक्के कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता सामान्य जनतेची मोजणीची कामे पुन्हा रखडणार आहेत. २३ ते २७फेब्रुवारी या कालावधीत सामूहिक अर्जीत रजा टाकून असहकार आंदोलन केले जाणार आहे.
ई-मोजणी व्हर्जन २ सॉफ्टवेअर हे व्हर्जन १ प्रमाणे सुटसुटीत व वापरास सोपे करावे. अधिकारी/कर्मचाऱ्यांवर नियुक्ती प्राधिकारी यांचे परवानगी व चौकशीशिवाय थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चुकीची व अमानवी पद्धत बंद करावी, मोजणी प्रकरणांबाबत १४ जानेवारी २०२६ चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला पुरेसे व स्वतंत्र मोजणी साहित्य रोवर, लॅपटॉप, डाटा कार्ड आदी पुरविणे, शासकीय सुटीच्या दिवशी अपवाद वगळता कोणतेही कामकाज करण्यात येऊ नये, याबाबत संबंधितांना सूचना देणे, अन्यायकारक प्रतिनियुक्ती बंद करणे, अतिरिक्त कामकाज केल्यास त्याचा मोबदला नियमानुसार देण्याबाबत, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या स्तरावरून नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या वेतन वसुली आदेश थांबविणे या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या कर्मचाऱ्यांनी १८ व २० फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणी काम पूर्णपणे बंद केले तसेच काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सामूहिक अर्जीत रजा टाकून असहकार आंदोलन सुरु केले आहे. तसेच २७ रोजी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) यांच्या पुणे येथील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन संघटनेने केलेल्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा केली जात आहे. शासनाने या मागण्या पूर्ण न करुन त्याकडे दुर्लक्ष केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करत २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.



