रत्नागिरी

धर्मराज वाडकर यांच्या अकाली निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा

संगमेश्वर दि. २४ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर नजीकच्या निढळेवाडी येथील रहिवासी आणि प्रयोगशील पदवीधर शिक्षक धर्मराज नामदेव वाडकर यांचे २३ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने ओझरखोल संगमेश्वरसह शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

धर्मराज नामदेव वाडकर हे अत्यंत हुशार आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर येथे झाले होते. प्रशालेतील हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचे नांव फलकावर लिहिण्यात आले होते. शिक्षण क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी एम एड पर्यंत शिक्षण घेऊन जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षक म्हणून लोटेमाळ येथे ज्ञानदानाचे काम केले. सोमवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

निढळेवाडी येथे त्यांच्या गावी हे वृत्त समजताच तीव्र दु :ख आणि हळहळ व्यक्त करण्यात आली. संगमेश्वर येथेही धर्मराज वाडकर उत्तम शिक्षक म्हणून परिचित होते. व्यापारी पैसा फंड संस्था, पैसा फंड प्रशाला व्यवस्थापन निढळेवाडी येथील ग्रामस्थ, लोटेमाळ प्रशाला आणि शिक्षणक्षेत्रातून धर्मराज नामदेव वाडकर यांच्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.धर्मराज वाडकर यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button