रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून समीर तिवरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
गट नेतेपदाची जबाबदारी नगरसेवक राजू तोडणकर यांचेकडे; भाजपाचा बैठकीत निर्णय

रत्नागिरी दि. १० :- रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पद भाजपाला देण्यात आल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, भाजपकडून समीर तिवरेकर यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. भाजपकडून गट नेतेपदाची जबाबदारी नगरसेवक राजू तोडणकर यांचेकडे देण्यात आली आहे. रत्नागिरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. १२) होणार आहे. त्यासाठी भाजपाची आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आता सोमवारी याची औपचारिकता पूर्ण होणार आहे. तीन स्वीकृत नगरसेवकांचीही नावे निश्चित झाली आहेत. यामध्ये भाजपाकडून बाबू सुर्वे तर शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी पुन्हा स्वीकृत म्हणून मागच्या दाराने पालिकेत दिसणार आहेत. तर युवा पदाधिकारी अभिजीत दुडये यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागणार आहे.
महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीमध्ये ठरलेलेल्या धोरणाप्रमाणे नगराध्यक्षपद शिवसेनेला तर उपनगराध्यक्षपद भाजपाला देण्यात आले आहे. त्यानुसार १२ जानेवारीला उपनगराध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे. यासाठी भाजपामधुन राजू तोडणकर, समिर तिवरेकर, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे यांची नावे चर्चेत होती. जिल्हा समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपचे उपनगराध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यात आले. राजू तोडणकर यांची गटनेते म्हणून निवड झाल्यामुळे समिर तिवरेकर यांना उपनगराध्यक्ष म्हणून पक्षाने एकमताने निवड केली.



