पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार : ना. नितेश राणे

कणकवली दि. १० :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर येथे आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा देखील करणार आहे. पंढरपूर येथे जागा घेतली आहे. त्याठिकाणी येत्या दोन ते तीन वर्षांत वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या वारकरी भवनामध्ये निवास व्यवस्था, भोजन, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पंढरपूर वारीच्या काळात तसेच इतर वेळीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नीतेश राणे यांनी सांगितले.
भजनी कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळावा, या उद्देशाने कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा’ उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पालकमंत्री नाम. नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पुढील चार वर्षांत भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना, मानधन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भजन सदन उभारणी, कलाकार मानधन वाढ, तसेच पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. भजनी कलाकारांना न्याय व ओळख मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



