रत्नागिरी

संगमेश्वर – लोवले येथे विहिरीत पडले पाच रानगवे; रानगव्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात वनाधिकाऱ्यांना आले यश

संगमेश्वर दि. १२ :- तालुक्यातील लोवले येथील संतोष प्रदीप खेडेकर यांचे कोरड्या विहिरीमध्ये पाच गवे पडल्याची घटना बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेत या पाचही रानगव्यांना बाहेर काढत त्यांना जंगलाच्या दिशेने सोडले.

यासंदर्भात कृषी सहाय्यक श्री. समीर दोरखडे यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख व सर्व स्टाफ मिळून आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर विहीर ही कोरडी, (पाणी नसल्याचे ) दिसून आली.

सुमारे १५ ते २० फूट खोल व सुमारे पंधरा फूट व्यास असल्याचे दिसून आले. या विहिरीची बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता दोन मोठे पुर्ण वाढ झालेले गवे व तीन छोटे रानगवे असे मिळून पाच रानगवे विहिरीत असलेचे दिसून आले. विहिरीची उंची जास्त असल्याने त्यांना विहिरीबाहेर पडता येत नसल्याचे दिसून आले. सदर परिस्थितीची पाहणी केली असता पडीक विहिरीला एका बाजूने जेसीबीच्या सहाय्याने वाट (रॅम) तयार करून विहिरीत अडकलेल्या रानगव्यांना नैसर्गिकरित्या रस्ता करून देण्यात आला.  या तयार केलेल्या मार्गावरून एकूण पाच रानगवे सुरक्षित सुमारे रात्री 1:30 वा बाहेर काढण्यात आले रानगव्यास कोणतीही इजा अथवा दुखापत झालेली नसून, नैसर्गिकरित्या हे रानगवे जंगलाच्या दिशेने सुरक्षित निघून गेले. या रानगव्यांमध्ये एक मोठा नर व मादी तसेच त्यांची तीन पिल्ले असल्याचे दिसून आले. हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर देवरुख श्री. सागर गोसावी, वनरक्षक फुणगूस श्री. आकाश कडुकर, वनरक्षक आरवली श्री. सुरज तेली व वनरक्षक साखरपा श्री. सहयोग कराडे यांनी केली. सदरील रेस्क्यू ऑपरेशन करतेवेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचेही सहकार्य रेस्क्यू ऑपरेशन साठी लाभले.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 19 26 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने मा विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button