
संगमेश्वर दि. ५ ( प्रतिनिधी ):- रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषवताना केवळ आपल्या एकाच गटाचा विचार न करता आपण संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवला. विविध प्रकारची विकास कामे पूर्णत्वास नेल्याचा नक्कीच आनंद आहे. मात्र आता उर्वरित विकास कामांसाठी मी पुन्हा एकदा कोसुंब जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला सामोरा जात आहे. विकास कामामुळे मिळणारा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला विजयपथावर नेईल याचा आपल्याला विश्वास आहे. उर्वरित विकास कामांसाठी जनतेने आपल्याला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि कोसुंब जिल्हा परिषद गटाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रोहन बने यांनी केले आहे.
आपली राजकीय कारकीर्द जरी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून सुरू झाली असली तरी, आपले वडील सुभाष बने हे आमदार असल्यामुळे त्यांच्याकडून विकास कामांचे बाळकडू तसेच जनतेजवळ समन्वय कसा साधायचा आणि समाजातील तळागाळातल्या व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात कसे आणायचे याचे धडे आपल्याला वेळोवेळी मिळाले होते. केवळ पाखाडी, रस्ते, पाणी योजना म्हणजेच विकास असे नव्हे तर, अशी कामे करणे हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच ठरते. या व्यतिरिक्त जनतेच्या असणाऱ्या अनेक अडचणी व्यक्तिशः सोडवणे, वाडी वस्तीवर गावात सतत संपर्क ठेवणे, विविध योजनांची देखभाल आणि दुरुस्ती वेळच्यावेळी होते की नाही यावर लक्ष ठेवणे, शासकीय योजनांचा लाभ मिळत असताना सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणे हेच खरे लोकप्रतिनिधीचे काम असल्याचे रोहन बने यांनी स्पष्ट केले.
आज कोसुंब जिल्हा परिषद गटात फिरत असताना आबा वृद्धांचे मिळणारे आशीर्वाद, महिलांकडून होणार सन्मान, वयोवृद्ध व्यक्तींकडून आशीर्वादासाठी डोक्यावर ठेवला जाणारा हात, विश्वासाने सांगितली जाणारी विकास कामे , याबरोबरच आपण या गटाचे नेतृत्व करताना केलेली विकास कामे याचा जनतेतून होणारा उल्लेख आणि आठवण हीच आपल्या जनसेवेची खरी कमाई आहे.
निवडणूक लढवत असताना युती मधील पक्षामध्ये मतभेद असू शकतात मात्र ते मनभेदापर्यंत न्यायचे नाहीत अशी आपल्याला शिकवण मिळाली आहे आणि असेच संस्कार आपल्यावर झाले आहेत. कोणतीही लढाई मतभेद झाल्यावर मित्रत्वानेच लढावी असं आपलं स्पष्ट मत असल्याचे रोहन बने यांनी नमूद केले. कोसुंब जिल्हा परिषद गटात फिरत असताना गावागावात आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, याचाच अर्थ आपण या भागाचा सदस्य म्हणून आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून जी विकास कामे केली त्याचेच आशीर्वाद देण्यासाठी जनता आपल्याला बैठकांसाठी स्वतःहून बोलवत आहेत आणि भरभरून प्रेम देत आहेत हीच आपल्या प्रामाणिक कामाची पोच पावती आहे.
कोसुंब जिल्हा परिषद गटात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण नक्कीच विजयी होवू. एवढेच नव्हे तर या गटात जी विकास कामे पूर्णत्वास नेणं जनतेला अपेक्षित आहे त्या व्यतिरिक्त आपण आपल्या जाहीर नाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे रोहन बने यांनी नमूद केलं.
विजय रोहन बने यांचाच
आपण प्रथम संगमेश्वर तालुक्याचा सभापती म्हणून जी विकास कामे करुन प्रशासनाला शिस्त लावली ते आजही जनतेच्या स्मरणात आहे. याच बरोबर जिल्हा परिषदेत काम करताना आणि संगमेश्वर तालुक्याचा आमदार म्हणून काम करताना आपण वैयक्तिक संपर्कावर भर दिला आणि तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढला. तालुक्यातील जनता आजही अपल्यावर तेवढंच प्रेम करत आहे याची अनुभूती वेळोवेळी येते. कोसुम्ब गटा मधील मतदार रोहन बने यांना प्रचंड मतांनी विजयी करतील.
-सुभाष बने, माजी आमदार



