रत्नागिरी

परचुरी गावाच्या विकासासाठी सर्वाधिक निधी दिला – पालकमंत्री उदय सामंत

रचना महाडिक यांचा विजय निश्चित

संगमेश्वर दि. ५ ( प्रतिनिधी ):- शिवसेनेच्या माध्यमातून खाडीभागाचा सर्वांगीण विकास करण्यात आला असून परचुरी गावाच्या विकासासाठी सर्वाधिक निधी देण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा उद्योगमंत्री मा. ना. श्री. उदय सामंत यांनी केले. परचुरी येथे महायुतीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

आमदार सर्वसामान्य माणसाच्या घरी जेवायला येतो, हा अनुभव परचुरीवासीयांनी सर्वप्रथम घेतला असून “परचुरी पूल झाला नाही तर मी या गावात मत मागायला येणार नाही,” असे ठाम आश्वासन देऊन अवघ्या तीन वर्षांत हा पूल पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार उदय सामंत ज्या ठिकाणी जातील, त्यांच्या पाठीशी परचुरी गाव एकमुखाने उभे राहील, असा निर्धार गावकऱ्यांनी यापूर्वीच केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुणबी समाजाच्या उमेदवार शर्वरी वेल्ये या निवडणूक रिंगणात असून त्यांना बहुमताने निवडून देणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे आवाहन सामंत यांनी केले. पोचरी गावाची माहेरवासीन असलेली लेक शर्वरी वेल्ये हिच्या पाठीशी अख्खा गाव एकदिलाने उभा राहिला असून आता परचुरी म्हणजेच सासरने तिला सांभाळले पाहिजे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणून कुणबी समाजातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना नासा येथे पाठविण्याचे काम करण्यात आल्याचे सांगत समाजाचे राजकारण करण्यापेक्षा आपल्या मुलांचे भविष्य आणि करिअर घडविणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही लोक आपण कुणबी समाजासाठी काहीच केले नाही असा अपप्रचार करीत असल्याचा उल्लेख करत, कुणबी समाजातील सर्वाधिक मुला-मुलींना अमेरिकेत नेण्याचे काम आपणच केले असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

या जाहीर सभेला निलेश सांबरे, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, कसबा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रचना महाडिक, पंचायत समिती उमेदवार शर्वरी वेल्ये, राजेश मुकादम, महेश देसाई, परशुराम वेल्ये, पूनम देसाई, गावातील वाडी प्रमुख, प्रतिष्ठित नागरिक तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेला उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button