स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या पहिल्या व्यवस्थापिका सौ.अमृता सोमण यांचे निधन

रत्नागिरी दि. ७ : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापिका सौ.अमृता सोमण( वय-५९) यांचे आळंदी स्थित रहात्या घरी दीर्घ आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले.
सौ. सोमण यांनी सन १९९२ पासून सन २०१३ पर्यत स्वरूपानंद पतसंस्थेच्या व्यवस्थापिका म्हणून अत्यंत उत्तम काम केले होते. संस्थेच्या प्रारंभिक अत्यंत कठीण काळात त्यांनी व्यवस्थापिका म्हणून प्रभावी काम केले होते. उत्तम ग्राहक सेवा देत त्यांनी प्रभावी कामकाज केले. अकाउंटिंग , ऑफिस रेकॉर्ड, इतिवृत्त, लिखाण या महत्वाच्या बाजू त्यांनी अत्यंत अचूक पद्धतीने हाताळल्या. अत्यंत प्रामाणिक आणि नीटनेटके वर्तन हा त्यांचा गुणविशेष होता. त्यांच्या कारकिर्दीत स्वरूपानंदला “सहकार भूषण पुरस्कार” प्राप्त झाला होता.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या १७ ही शाखांमध्ये माजी व्यवस्थापिका सौ. सोमण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली. सौ.सोमण यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या व्यवस्थापनात दिलेली साथ ही लाखमोलाची होती. संस्थेच्या जडणघडणीत सौ.सोमण यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, कामातील अचूकता, प्रामुख्याने हिशेबीय कामकाज करण्याची त्यांची हातोटी यामुळे स्वरूपानंदतील कर्मचाऱ्यांवर शिस्तीचे, नेकीच संस्कार झाले आणि त्यातूनच स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची ओळख निर्माण झाली. प्रारंभी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर त्यांनी सेवाभावी वृत्तीने काम केले ते कधीही विसरता येणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत संस्थाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी संस्थेचे वतीने व वैयक्तिक श्रद्धांजली अर्पण केली.
सौ.सोमण यांचे निधनाने एक जवळची सहकारी काळाचे पडद्याआड गेली ह्याचे दुःख सहज विसरणे शक्य नाही अशा शब्दात आपल्या भावना ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.
सौ.सोमण यांचे पश्च्यात त्यांचे पती विकास सोमण व मुलगा सुयोग सोमण व त्यांची पत्नी असा मोठा परिवार आहे.



