रत्नागिरी

खालगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांचा विजय पक्का : ना. उदय सामंत

जाकादेवी दि. ३ :- रत्नागिरी तालुक्यासह करबुडे जिल्हा परिषद गटामध्ये व आताच्या खालगाव जिल्हा परिषद गटात भाजप शिवसेनेच्या काळात प्रचंड मोठी विकास कामे झालेली आहेत. आजही विकास कामे सुरू आहेत. विकासासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही. जाती-पातीचे राजकारण करणाऱ्या मंडळींना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, एवढेच नव्हे तर उबाठाच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त होण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मताने निवडून आणण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रचार यंत्रणेत उतरा, असे आवाहन करत खालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा विजय शंभर टक्के असल्याचा ठाम विश्वास राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आयोजित आढावा बैठकीत कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला.

येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मताने निवडून देण्याचे आवाहन उद्योग मंत्री यांनी केले‌. विकास हाच आमचा ध्यास, विकासासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही, रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांचा विकास हा भाजप शिवसेना युती काळात झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत खालगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना ९० टक्के पेक्षा मतदान होणार आहे. खालगाव जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट यामध्ये महायुतीचेच उमेदवार शंभर टक्के विजय होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी असे सांगून महायुतीच्या विजयी उमेदवारांनी समाजातील व्यक्तींच्या सेवेसाठी २४ तास दिले पाहिजेत. एवढेच नव्हे तर विजयी उमेदवारांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे, अशी उमेदवारांना कर्तव्याची जाणीव करून देत महायुतीच्या कार्यकर्त्यांना रोजगाराच्या दृष्टीने सक्षम बनविण्यासाठी अनेक उद्योग, व्यवसाय कोकणात आणले जातील.महिला बचत गटांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे ते बोलले.

खालगाव जाकादेवी येथे काळे सभागृहात आयोजित जिल्हा परिषद खालगाव गटात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीच्या ते बोलत होते. ते बोलताना असे म्हणाले की शिवसेना भाजप शिवाय विकास होऊ शकत नाही. जिल्हा परिषद खालगाव गटात झालेली विकास कामे ही महायुतीच्या माध्यमातून झालेली विकास कामे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकतीने या निवडणुकीमध्ये उतरून जिल्हा परिषद गटातून उभे राहिलेल्या बाबू म्हाप, खालगाव पंचायत समिती गटातून उभे असलेल्या नेहा गावणकर, तसेच करबुडे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पांचाळ या उमेदवाराला विक्रमी मतांनी विजय प्राप्त करून द्या, असे आवाहन करताना ते म्हणाले की, उबाठाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, एवढेच नव्हे तर महायुतीचे सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेला खालगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार बाबू म्हाप, खालगाव पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार नेहा गावणकर, करबुडे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पांचाळ, उदय सामंत यांच्या समवेत शिवसेना संपर्क प्रमुख श्री. मोरे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई , भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, विल्ये गावचे विद्यमान सरपंच स्वप्निल देसाई, सामाजिक कार्यकर्ते आप्पा घाणेकर, दादा कुळ्ये, संस्कृती पाचकुडे, यांसह परिसरातील जुने जाणते महायुतीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थि होते.

रत्नागिरीतील आगवे गावातील ग्रामस्थ कित्येक वर्षे माझ्या पाठीशी खंबीरपणे आणि मोठ्या विश्वासाने उभे राहिले , सर्व त्या सर्व ग्रामस्थांप्रती मंत्री उदय सामंत यांनी आवर्जून उल्लेख करून आगवे गावातील एकजूटीबद्दल गौरवोद्गार काढले.आगवे गावातील आदर्श इतर अनेक गावांना घेण्यासारखा असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले. कार्यक्रमाचा उद्देश आणि सूत्रसंचलन करबुडे शिवसेना विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकृत उमेदवार प्रवीण पांचाळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button