संगमेश्वर महामार्गावर ठेकेदाराच्या नादुरुस्त वाहनांचा धुमाकूळ, रस्ता कामात बेबंदशाही
पादचाऱ्यांना चालायलाही मार्ग नाही; ठेकेदारांच्या गाड्यांवर कारवाईची टाळाटाळ; वाहन चालवण्याचे परवाने नाहीत

संगमेश्वर दि. ३० ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर सुरू असलेल्या रस्ते विकास कामांच्या परिसरात नियमबाह्य, जीर्ण आणि अपूर्ण सुविधांची वाहने खुलेआम धावत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या वाहनांमुळे महामार्गावरील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून, उप प्रादेशिक परिवहन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.याबरोबराच रस्ता काम करताना बेदारकारपणा, बेबंदशाही आणि दादागिरी सुरु असल्यामुळे सर्व सामान्य संगमेश्वरकर अक्षरशः हतबल आणि हताश झाला आहे.
महामार्गावर धावणाऱ्या अनेक वाहनांना क्रमांक फलकच नसल्याचे दिसून येत आहे. काही वाहनांना फक्त पुढील किंवा फक्त मागील क्रमांक फलक आहे, तर काहींचे क्रमांक इतके अस्पष्ट आहेत की वाचणे अशक्य होते. याशिवाय दिशादर्शक दिवे, परावर्तक पट्टे, मुख्य हेडलाईट्स नसणे किंवा अत्यंत अंधुक असणे, असे गंभीर दोष अनेक वाहनांमध्ये आढळून येत आहेत. काही वाहने इतक्या मोडक्या अवस्थेत आहेत की, अशी वाहने रस्त्यावर धावणे म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ ठरत आहे. नागरिकांनी यापूर्वीही संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र एवढे होऊनही परिवहन विभागाकडून कोणतीही ठोस आणि व्यापक कारवाई होताना दिसत नाही.
दरम्यान, सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यामध्ये अतिवेगात धावणाऱ्या एका मोठ्या मालवाहतूक वाहनाला जागरूक नागरिकांनी थांबवून जाब विचारल्याचे दिसते. चौकशीत संबंधित परप्रांतीय चालकाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघड झाले. त्याच्याकडे केवळ हलक्या वाहनाचा परवाना असून तोही जवळ नसल्याचे त्याने मान्य केले. हे वाहन महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे असल्याचे सांगत चालकाने कंपनीचे नावही उघडपणे घेतले आहे.
सदर वाहन अत्यंत दयनीय अवस्थेत असून, त्याची नोंदणी आणि फिटनेस प्रमाणपत्र कसे व केव्हा मंजूर झाले, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांमध्ये एखादी किरकोळ त्रुटी आढळली तरी उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र तळकांटे ते आरवली दरम्यान महामार्गावर रात्रंदिवस धावणाऱ्या ठेकेदारांच्या वाहनांवर कारवाई करण्यास परिवहन विभाग का कचरतो, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर एका मालवाहतूक वाहनावर आहे टी ओ नी केलेली कारवाई अपवादात्मक ठरली. दररोज नियम मोडणाऱ्या असंख्य वाहनांकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जाते, याचे उत्तर परिवहन विभागाने द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.परिवहन विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी चालकांचे परवाने, वाहनांची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्रे आणि कायदेशीर पात्रता यांची सखोल तपासणी करून कठोर कारवाई करणार का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात होणाऱ्या गंभीर अपघातांची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
सेवा रस्ते न करता महामार्गाचे काम
संगमेश्वर बसस्थानक ते रामकुंड वळण या दरम्यान दुतर्फा पोष्ट, बँक, महावितरण कार्यालय, व्यापारी गाळे, नागरिकांची घरं आहेत. यासाठी प्रथम सेवा रस्ते करुन देणं आवश्यक होतं. मात्र असे रस्ते न करता थेट महामार्ग खोदून नागरिकांची आणि वाहन चालकांची मोठी गैरसोय करुन ठेवण्यात आली आहे. कॅनरा बँके समोर एक वाहन जावू शकेल असा देखील रस्ता ठेवण्यात आला नसून येथे सूरक्षे साठी केवळ प्लॅस्टिक पट्टी लावून ठेवण्यात आली आहे. वास्तवीक सुरक्षेसाठी सिमेंट ब्रिक्स लावल्या जातात संगमेश्वर येथे मात्र संबंधित ठेकेदाराची बेपर्वाई स्पष्टपणे दिसून येत आहे.
महामार्गाचे काम करताना डायव्हरजनचे फलक लावलेले नाहीत. वाहनचालक आणि नागरिकांनी विनंती केली असता संबंधित ठेकेदाराची माणसं दादागिरी करतात, आणि आमचं कोणी काही करु शकत नाही आम्हाला मोठा वरदहस्त आहे असे सांगून मुजोरी करत असल्याने संगमेश्वरकर हतबल झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कनिष्ठ अभियंता यांना याबत सांगितलं असता त्यांनीही ठेकेदार आमचं ऐकत नाहीत असेच सांगितलं. इतकी भयावह स्थिती संगमेश्वरला असल्यामुळे व्यथा मांडायच्या कोणाकडे असा सवाल व्यापारी अमोल शेट्ये यांनी उपस्थित केला आहे.
कार्यकारी अभियंता दखल घेत नाहीत
संगमेश्वर येथे सेवा रस्ते पूर्ण केल्याशिवाय चौपादरीकरणाचे काम हाती घेतले जाणार नाही असं आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात असं न करता ठेकेदाराने प्रथम सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता चौपदरीकरण करण्यासाठी खोदाई सुरु केली. परिणामी आज आम्ही आमच्या गाड्या आडव्या लावून काम थांबवलं. असं केल्यानंतर ठेकेदार कंपनीचा मॅनेजर आला आणि त्यानेही केवळ आश्वासनं द्यायला सुरुवात केली. मात्र प्रथम सेवा रस्ते आणि नंतर महामार्ग अशी ठाम भूमिका घेतल्यावर सेवा रस्त्याचे काम सध्या तरी सुरु करण्यात आलं आहे. मात्र सुरक्षेच्या उपाययोजना नसल्यामुळे येथे मोठा अपघात होण्याचा धोका आहे.
– दिलीप रहाटे, व्यापारी संगमेश्वर


