रत्नागिरी

प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाचा उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थ्यांशी विशेष संपर्क कार्यक्रम

रत्नागिरी दि. २७ :- रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली व नागरिक-केंद्रित पोलीसिंगच्या संकल्पनेनुसार, रत्नागिरी पोलीस दलामार्फत प्रजासत्ताक दिन २०२६ च्या निमित्ताने उत्तर-पूर्व भारतातील नागालँड व मणीपुर या राज्यांमधून शिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “विशेष संपर्क” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात उत्तर-पूर्व भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षण, नोकरी व करिअरच्या संधीसाठी आपल्या कुटुंबापासून व मूळ गावापासून दूर वास्तव्यास आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपुलकीची भावना देणे, त्यांच्या समस्या समजून घेणे व त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे या उद्देशाने दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आयोजित ध्वजारोहण समारंभासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

या अनुषंगाने, चिपळूण तालुका, जिल्हा रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेल्या व शिक्षण घेणाऱ्या उत्तर-पूर्व भारतातील एकूण १९ विद्यार्थ्यांसोबत मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांचा “विशेष संपर्क” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या “विशेष संपर्क” कार्यक्रम दरम्यान पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच पोलीस विभागांची व पोलीस विभागामार्फत राबविण्यात येत असलेले विविध मिशन, प्रोजेक्ट, डिजिटल अॅप्लिकेशन बाबत सविस्तर माहिती दिली.

या विशेष संवादातून या विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याची व कोणत्याही अडचणीच्या वेळी निर्धास्तपणे पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याचा दिसून आला.

विविध भाषा, संस्कृती व प्रांत असूनही आपण सर्व भारतीय आहोत, हा एकतेचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला आहे तसेच रत्नागिरी पोलीस दल भविष्यातही अशा प्रकारचे लोकाभिमुख उपक्रम राबवून सर्व घटकांशी संवाद वाढविण्यास कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button