रत्नागिरी शहरात भीषण अपघात; सहेली ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. सुनीता साळवी यांचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी, दि. १९ : रत्नागिरी शहरात रविवारी संध्याकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. शहरातील प्रसिद्ध सहेली ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. सुनीता राजेश साळवी (वय अंदाजे ५५) यांचा हिट अँड रन अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सुनीता साळवी या रस्त्यावर पडलेल्या असताना भरधाव वेगाने आलेल्या होंडा सिटी चारचाकी वाहनाने त्यांच्या अंगावरून गाडी नेली. अपघातानंतर वाहनचालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याने हा प्रकार हिट अँड रन स्वरूपाचा ठरला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात राजीवडा येथील युवकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांना घटनेबाबत अवगत करण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना दिले आहेत. पोलीस तपास वेगाने सुरू असून संबंधित वाहन व चालकाचा शोध घेण्यात येत आहे.



