
दापोली दि. १६ :- स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते म्हणून ज्यांना संपूर्ण भारत देशाला अभिमान आहे. असे महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशाबा जाधव यांच्या जन्म दिन १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून दापोली तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दापोली तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, पंचायत समिती ( शिक्षण विभाग ) व ए. जी. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन यासाठी रॅली सकाळी ९ वाजता तालुका क्रीडा संकुल – पोलीस स्टेशन – बाजारातून ए. जी. हायस्कूल येथे स्केटिंग, तायक्वांदो, लेझीम, ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. मुलांच्या अल्पोपहारानंतर ए.जी हायस्कूलच्या माधवराव कोकणे सभागृहात उपस्थित तालुका क्रीडा अधिकारी सुनिल धारूरकर, गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे, केंद्रप्रमुख सुनील कारकिले, ए.जी. हायस्कूल स्कूल कमिटी चेअरमन रवींद्र कालेकर, तालुका समन्वयक व आगरवायंगणी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यवान दळवी, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला, ज्ञानदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक मधुकर मोरे, ए.जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. कांबळे, उप मुख्याध्यापक अर्जुन घुले, लोकमान्य हायस्कूलच्या मुख्याध्यापिका काजल राऊत, ए.जी. हायस्कूल क्रीडा शिक्षक प्रदिप शिगवण व प्रथमेश दाभोळे, राजेंद्र देवकाते, वशिउल्ला दरवाजकर, विकास पाटील, शैलेश मिसाळ, श्री.येलवे असे विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत ऑलिंपिक वीर दिवंगत खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांचे स्वागता नंतर राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावर व्याख्याते ज्ञानदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक मधुकर मोरे यांनी सुरेख जीवन पट सादर केला. तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर, गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.जी. हायस्कूल स्कूल कमिटी चेअरमन रविंद्र कालेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शैलेश आठले यांनी सुरेख वाणीत केले.



