“मिशन प्रगती” तक्रारदाराला तपासाची माहिती थेट मोबाईलवर
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक केंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल अॅप्लिकेशन्स सुरु केले आहेत. या उपक्रमांमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे.
याच संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने “मिशन प्रगती” हा एक विशेष लोकाभिमुख उपक्रम दिनांक 10/07/2025 पासून अंमलात आणलेला आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे येथे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींचे पुढे काय झाले व आपण दिलेल्या तक्रारीचा / फिर्याद बाबत पुढे तपास कसा होत आहे याबाबत तक्रारदाराला /फिर्यादीला माहिती देणे सुलभ करण्याच्या उद्देशाने “मिशन प्रगती” हा विशेष लोकाभिमुख उपक्रम दिनांक 10/07/2025 रोजी पासून राबविण्यात येत आहे.
अनेकवेळा नागरिकांनी दाखल केलेल्या आपल्या तक्रारी अथवा FIR चे पुढे काय झाले, त्या तक्रारीचा तपास पुढे कुठपर्यंत पोहोचला आहे, काय कार्यवाही झाली आहे, या बद्दल ते अनभिज्ञ असतात व त्या बद्दल त्यांना पुढे अधिक माहिती मिळत नाही.
जेवढ्या FIR जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत किंवा दाखल होत आहेत व FIR दाखल झाल्यानंतर आपल्या दिल्या तक्रारीचा तपास पुढे कसा होत आहे किंवा तपास कसा पुढे सरकत आहे, काय कार्यवाही होत झाली आहे, याची माहिती तक्रारदारास वेळेवर मिळत नाही व त्यासाठी बऱ्याच वेळा तक्रारदाराला / फिर्यादीला संबंधित पोलीस ठाणे येथे जावे लागते व वारंवार पोलीस ठाणे येथे जावे लागल्यामुळे काही प्रमाणात अनावश्यक त्रास सहन करावा लागतो.
हा होणारा त्रास टाळण्यासाठी तसेच आपल्या दिल्या तक्रारीच्या तपासाची पारदर्शक व वेळेवर माहिती मिळावी तसेच तपास पुढे कसा होत आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाने “मिशन प्रगती” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या मिशन अंतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व FIR संदर्भात तक्रारदारांना / फिर्यादींना तपासाची सद्यस्थिती WhatsApp व SMS च्या माध्यमातून थेट कळविण्यात येते. या “मिशन प्रगती” अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 1,450 फिर्यादी यांना रत्नागिरी पोलीस दलामार्फत 4,508 संदेश (Messages) हे WhatsApp व SMS च्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत तसेच या मिशनचे कामकाज हे पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत नेमण्यात आलेले पोलीस 02 पोलीस अंमलदार यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
यामध्ये नागरिकांनी दिलेल्या तक्रारी बद्दल तसेच दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास कुठे पर्यंत आलेला आहे व पुढे या तक्रारीचे काय झाले? याबाबत संदेश (Messages) हे WhatsApp व SMS द्वारे पाठविण्यात येत आहेत. (जसे- घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे, आरोपींना अटक केल्याची माहिती, आरोपींना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 अन्वये नोटीस देण्यात आलेली आहे, अथवा गुन्ह्याचे दोषारोप-पत्र मा. न्यायालयात पाठविण्यात आलेली आहे व तपासातील महत्त्वाच्या टप्प्यांबाबत अद्ययावत माहिती) याबाबत माहिती सर्व फिर्यादी / तक्रारदार यांना “मिशन प्रगती” अंतर्गत WhatsApp व SMS च्या माध्यमातून देण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व तक्रारदारांना / फिर्यादी यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी “मिशन प्रगती” अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांचा लाभ घ्यावा तसेच पाठविण्यात येणारे WhatsApp व SMS संदेश हे केवळ त्यांच्या दाखल तक्रारीबद्दल / गुन्ह्याच्या तपासाबाबत वेळोवेळी अद्ययावत माहिती देणे आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या तक्रारी प्रभावी, पारदर्शक व वेळेत मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच “मिशन प्रगती” या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अथवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.



