रत्नागिरीराजकीय

चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा

चिपळूण दि. १४ : चिपळूणचे माजी आमदार व माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा, प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला आहे.

राजीनाम्याबाबत बोलताना रमेशभाई कदम यांनी सांगितले की, पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. नगराध्यक्ष पदासाठी स्वतः उमेदवार होऊन आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. वरिष्ठ नेतृत्वाकडून कसलेही सहकार्य मिळाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“मी १९८४ पासून शरद पवार साहेबांसोबत काम करत आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून पक्षात सक्रिय आहे. मंडळपासून ते राजापूरपर्यंत पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पक्षासाठी जे जे आवश्यक होते ते सर्व केले. मात्र आता पक्षात कार्यकर्त्यांना व नेत्यांना किंमत उरलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या परिस्थितीत पक्षात काम करण्याची इच्छाच उरलेली नसल्याचे सांगत रमेशभाई कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button