रत्नागिरी

संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे सादरीकरण सचिव ( रस्ते ) यांच्याकडे होणार

अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर - म्हैसकर यांच्या सचिवांना सूचना

संगमेश्वर दि. १० ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर – तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गापासून सुरु होणाऱ्या संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाला गती मिळावी आणि संबंधित कामाचे सादरीकरण करण्यासाठी सचिव कार्यालयाकडून आवश्यक परवानगी मिळावी म्हणून घाटमार्ग समन्वय समिती चे समन्वयक संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा पाटणकर- म्हैसकर यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना तशा आशयाचे पत्र देवून विनंती केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर यांनी सचिव ( रस्ते ) यांना सूचना करत संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे सादरीकरण सादर करावे अशा लेखी सूचना दिल्या आहेत.त्यामुळे संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाच्या प्रशासकीय कामाला गती येत असल्याचे दिसून येत असून मागील तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या या घाटमार्ग कामाला गती येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांच्या संवेदनशीलतेमुळे व सकारात्मक काम करणाच्या वृत्तीमुळे संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाला गती येताना दिसून येत आहे. अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर यांच्या सूचनेवरून तातडीने हालचालींना वेग येत सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव कार्यालयाकडून रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांना पत्र पाठवून संगमेश्वर – पाटण घाटमार्गाचा परीपुर्ण प्रस्ताव मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवावा असे पत्राद्वारे आदेश प्राप्त झाले होते. शासनाच्या आदेशानुसार संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे सादरीकरण रत्नागिरी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांच्या स्तरावर झाले आहे. मोनार्च कंपनीने त्यांचे प्रेझेंटेन्शन पहील्या टप्प्यात अधिक्षक अभियंता यांना केल्यानंतर पुढील प्रझेंटेंन्शन साठी सचिव ( रस्ते ) यांच्या परवानगीची गरज होती त्या अनुषंगाने समन्वयक संतोष येडगे यांनी अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर यांची भेट घेवून त्यांना विनंती केली. संतोष यांच्या विनंती नंतर तातडीने त्यांनी निर्देश दिले.

संगमेश्वर ते पाटण या ४६ कि.मी मधील लांबीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेयर्स ॲन्ड इंजिनीअरींग कंसल्टंट लि. या कंपनीला देण्यात आले आहे. घाटमार्ग कामाचा डीपीआर शासनाला सादर करण्याची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली आहे. विहीत मुदतीत या कंपनीने डीपीआर शासनाला सादर करुन प्रशासकीय मान्यता प्रक्रीया पार पाडत या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी अशी विनंती यावेळी संतोष येडगे यांनी केली होती.

संगमेश्वर ते चाफेर ( पाटण ) हा एकूण ४६.६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. २०.१०० कि.मी एकेरी रस्ता पुर्ण केल्यास या मार्गावरील वाहतूक सुरु होणार आहे.

संगमेश्वर पासून सुरु होणा-या या घाटमार्गाचा हातखंबा, रत्नागिरी, बावनदी, आंबेड, कोसुंब, करंबेळे, वाशी, धामणी, तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग , चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे,पाचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे,नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे, आदी आणि खाडीपट्ट्यातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परीसरातील गावांमधील लाखो नागरीकांना या मार्गाचा फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे हा रस्ता पुर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.या घाटमार्गासाठी दोन्ही जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अघिक जनता आग्रही आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button